सचिन पवार : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील मोरगाव परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मोरगाव येथे महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय पुणे यांच्या कार्यालयातून यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.
मोरगाव-नीरा हा मार्ग राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यावर दर महिन्याला सरासरी ८ ते १० अपघात घडत असतात. या अपघातांमध्ये गंभीर जखमींना तातडीने उपचार मिळण्यात विलंब होत असल्याने जीवितहानीची शक्यता वाढत होती. विशेष म्हणजे मोरगाव येथे कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अपघातस्थळी पोहोचण्यासाठी तब्बल ३५ ते ४५ मिनिटांचा विलंब होत असल्याची गंभीर बाब जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम (ढोले) यांनी आपल्या पत्राद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही स्वतंत्र अहवाल आणि मागणीपत्र सादर करून परिसरातील वाढत्या अपघातांचे गांभीर्य स्पष्ट केले होते. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या मागणीचे गांभीर्य ओळखून संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासनाने वेगाने हालचाली करत निर्णय प्रक्रियेला गती दिल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व मागण्यांची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यास मोठी मदत होणार असून भविष्यात अनेकांचे प्राण वाचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार सातत्याने होत असताना मोरगावसाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून आता अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळतील अशी भावना व्यक्त केली जात आहे.










