मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाकडून २९ एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावं नसल्याचं समोर आल्यानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पक्षात अंतर्गत बदल सुरू असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या.
व्हायरल झालेल्या पत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचे नाव असून, जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, पक्षातील महत्त्वाचे आणि अनुभवी नेते मानले जाणारे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या यादीमध्ये “तांत्रिक आणि क्लेरिकल चुका” असल्याचे म्हटले आहे. “ही यादी अंतिम नसून त्यामधील त्रुटी लवकरच दुरुस्त केल्या जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर पक्षाकडून अधिकृत दुरुस्त यादी कधी जाहीर होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे, याबाबत चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.










