ज्ञानेश्वर रायते, बारामती
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र गेली १० वर्षे सातत्याने दरवर्षी कृषिक प्रदर्शनाचे आयोजन करताना त्यामध्ये नवनवीन संकल्पनांची भर घालत आहे. दरवर्षी जगातील जे जे नवे संशोधन आहे, ते ते भारतात तातडीने आणण्याचा प्रयत्न करीत आहे, यावर्षीही तोच प्रयत्न आहे. येत्या १७ ते २४ जानेवारीदरम्यान हे प्रदर्शन बारामतीत होत आहे.
यावर्षी नेदरलॅंडमधील विविध नव्या संशोधित पिकांच्या बियाण्यांचा यामध्ये समावेश आहे. नेदरलॅण्डमधील विविध भाज्या येथे लागवड करण्यात आल्या आहेत. यामध्ये वांग्यापासून मिरची, सूर्यफूलापर्यंत समावेश असून खायच्या फुलांपासून ते स्ट्रॉबेरीपर्यंतचा समावेश आहे.
जपानमध्ये स्ट्रॉबेरीचे अधिक उत्पादन घेतले जाते, थोडक्यात आपल्याकडील १० गुंठ्यात घेतले जाणारे उत्पादन तिकडील १ गुंठ्यातही घेता येते, ते कसे घेतात याचे प्रात्यक्षिक बारामतीत उभारण्यात आले आहे. याखेरीज जपानी मिरच्यांचे उत्पादनही येथे घेण्यात आले आहे. चायनिज भाजीपाल्यांचेही येथे उत्पादन घेण्यात आले असून त्याची प्रात्यक्षिके कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर पाहायला मिळणार आहेत.











