निमगाव केतकी मध्ये रॅपिड एंटीजन चाचणी
आज निमगाव केतकी कडकडीत बंद
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
दररोज कोरोनाचा अहवाल जाहीर झाला की, निमगाव केतकी त्यात आहेच.. एकही दिवस असा जात नाही, ज्या दिवशी निमगाव केतकीतून कोरोनाचे रूग्ण आढळत नाहीत.. आरोग्य खाते देखील हैराण झालेत आणि गावकरी देखील.. मग आज माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा कडकडीतपणे गावात राबवला, पण एवढे करून गावात सापडले फक्त तीन रुग्ण..!
निमगाव केतकी मध्ये दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण सापडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने अखेर निमगाव केतकी आज (सोमवारी) दिवसभर बंद ठेवण्यात आली.
आज गावामध्ये 90 जणांच्या माध्यमातून 2,450 कुटुंबाच्या 12 हजार 397 नागरिकांची रॅपिड एंटीजन चाचणी घेण्यात आली. यामध्ये 24 नागरिक कोरोनाचे संशयित रुग्ण ठरवले, त्यांची चाचणी केल्यावर त्यातील फक्त तीनच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आज सकाळी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, निमगावचे प्रशासक श्री. बामणे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील गावडे, ग्रामविकास अधिकारी भगवान घोगरे यांच्या सहकार्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, डॉ. प्रतिभा गाडे, आरोग्य सहाय्यक बी. बी कुंभार, एस. यू .होले, श्रीमती टी. एस.उबाळे आदींसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली.
आज आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षक असे एकूण 90 जणांच्या माध्यमातून रॅपिड एंटीजन चाचणी घेण्यात आली. यामध्ये दोन जणांची एक टीम असे 25 टीम करण्यात आल्या. प्रत्येकी 5 टीम च्या पाठीमागे एक सुपरवायझर असे 45 टीम च्या मागे नऊ सुपरवायझर कार्यरत होते.
आतापर्यंत निमगाव केतकी मध्ये जवळपास दोनशे रुग्ण आढळून आले, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या अगोदर 14 सप्टेंबर 2020 रोजी अशीच रॅपिड एंटीजन टेस्ट घेण्यात आली होती, त्यावेळी 67 रुग्णांमध्ये अकरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. निमगाव केतकी हा भाग हॉटस्पॉट झाला असल्याने आज संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते त्याद्वारे आज कोरोना चे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले.










