सचिन पवार : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुपे परिसरात जनाई उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पाण्याअभावी पिके धोक्यात आली आहेत. पूर्वी अजितदादांच्या आशीर्वादाने तीन आवर्तने वेळेत मिळत होती मात्र आता तारीख पे तारीख मिळत असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे अशी हळहळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शौकतभाई कोतवाल यांनी व्यक्त केली आहे.
सध्या उन्हाच्या तीव्र झळा आणि पाण्याअभावी ऊस पिके अक्षरशः जळू लागली आहेत. कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, उसाचे पैसे अडकले, त्यात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आज शेतकऱ्याला जगण्यासाठी तीन आवर्तनांची नितांत गरज आहे, मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि तारखा दिल्या जात असून अजितदादांचा अपघात झाल्यापासून आम्ही शेतकरी आणि गोरगरीब पोरके झाल्यासारखे आहोत.
पूर्वी दादांच्या पाठबळामुळे जनाई उपसा सिंचन योजनेतून नियमित पाणी मिळत होते. आज मात्र अन्याय सहन करावा लागत आहे. पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना पाणी मिळत नसल्याने उभी पिके डोळ्यादेखत जळत चालली आहेत असे मत शौकत कोतवाल यांनी व्यक्त केले आहे.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आवर्तनाची तारीख आता जगण्याची की मरणाची असा सवाल उपस्थित केला आहे. वाढत्या आर्थिक अडचणी, शेतीचे नुकसान आणि पिकांच्या वाळत चाललेल्या अवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांना आता आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही अशी वेदनादायी भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशाचा मान राखून आणि माणुसकीच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या जिवीताचा विचार करून तातडीने आवर्तन सोडावे अशी नम्र आणि ठाम मागणी शौकत कोतवाल यांच्याकडून करण्यात येत आहे.










