बारामती : महान्यूज लाईव्ह
अवैध सावकारी, वाढीव व्याजाची मागणी आणि सततच्या धमक्यांना कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पाच जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रूपाली धनेश गोसावी (वय ३६, रा. पारवडी गोसावी वस्ती, ता. बारामती) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू उर्फ लखन यादव डावरे, जयश्री लखन यादव डावरे (दोघे रा. साठेनगर, इंदापूर) तसेच सतीश शहाजी लांडगे, मारुती हरीदास लांडगे आणि प्रितम उर्फ कावा लांडगे (रा. पारवडी, ता. बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धनेश गुंडिबा गोसावी यांनी आरोपींकडून घेतलेल्या पैशांवर मुद्दलापेक्षा अधिक रक्कम आणि व्याज अदा करूनही आरोपींकडून सतत पैशांची मागणी केली जात होती. इतकेच नव्हे तर “राहिलेले व्याजाचे पैसे आणि दंड दे, अन्यथा जीव मारू,” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दि. २४ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास पारवडी येथील शेतात धनेश गोसावी यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच सावकारी अधिनियम कलम ३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करत आहेत.










