चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी १३ महिलांचा गट गेला होता. शुक्रवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलांवर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय ४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय ४६), संगीता संतोष चौधरी (वय ३६) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (वय ३३) या चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली. संबंधित वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने शोध मोहीम आणि जंगल परिसरातील गस्त वाढवली आहे. दरम्यान, मानव-वन्यप्राणी संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जंगलालगतच्या गावांमध्ये सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच मृत महिलांच्या कुटुंबीयांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्याची मागणीही जोर धरत आहे. तेंदूपत्ता हंगामात नागरिकांनी जंगलात एकटे जाणे टाळावे, तसेच समूहाने व आवश्यक खबरदारी घेऊनच जंगलात प्रवेश करावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.










