विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
फलटण : फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी घडामोड घडली असून, श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली असून, या सभेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यासोबतचा भागीदारी करार रद्द करण्यास मंजुरी देण्यात आली.
यासोबतच आगामी काळात कारखाना, अर्कशाळा आणि मद्य विभाग खासगी अथवा सहकारी संस्थेला चालविण्यास देण्याचाही मार्ग मोकळा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आता हा कारखाना “श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड”कडे चालवण्यासाठी देण्याबाबत निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे.
कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली.
सभेत ९ मार्च २०२२ रोजी करण्यात आलेला कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यासोबतचा भागीदारी करार अधिकृतपणे रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. यावेळी सभेत बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या आर्थिक अडचणींचा सविस्तर आढावा मांडला.
साखरेच्या दरातील सतत होणारे चढ-उतार, शासन नियमांनुसार ऊस उत्पादकांना वेळेत एफआरपी देण्याची जबाबदारी, वाढलेला तोडणी आणि वाहतूक खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अल्प कालावधीसाठी कारखाना चालवावा लागल्यामुळे सातत्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीत जवाहर कारखान्याने मुदत संपण्यापूर्वीच भागीदारी करार रद्द करण्याबाबत पत्र दिल्याने पुढील निर्णयासाठी विशेष सभा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पुढे सांगितले की, कारखाना स्वतःच्या व्यवस्थापनाखाली सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.मात्र, नेटवर्क उणे असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अपेक्षित कर्ज मिळू शकले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक, कामगार आणि इतर देणी वेळेत भागवण्यासाठी कारखाना सक्षम आर्थिक पाठबळ असलेल्या संस्थेकडे चालवण्यास देण्याचा पर्याय स्वीकारावा लागला.
दरम्यान,कारखाना चालवण्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.त्याला प्रतिसाद देत श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज या दोन संस्थांनी प्रस्ताव सादर केले. त्यामध्ये श्री दत्त इंडिया प्रा. लि. ने कारखान्यास अधिकचा आर्थिक मोबदला देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सभेत देण्यात आली. त्यामुळे शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर श्री दत्त इंडिया यांच्यासोबत करार करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी,कामगार आणि सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.











