विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
फलटण : फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी राजकीय आणि आर्थिक उलथापालथ घडवणारी घडामोड समोर आली असून,श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत आता निर्णायक टप्पा आला आहे.गेल्या काही वर्षांपासून भागीदारीच्या चर्चांमुळे सतत चर्चेत असलेल्या श्रीराम कारखान्याने आता थेट भागीदारी करार रद्द करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.त्यामुळे फलटणसह संपूर्ण परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष १८ मे रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेकडे लागले आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण यांच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभेची अधिकृत नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर ही सभा पार पडणार असून,कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.या सभेला केवळ नियमित प्रक्रिया म्हणून न पाहता,कारखान्याच्या पुढील अस्तित्वाचा आणि धोरणात्मक वाटचालीचा मोठा टर्निंग पॉइंट मानले जात आहे.
या सभेतील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी-यळगुड येथील ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’ यांच्यासोबत झालेला भागीदारी करार रद्द करण्याचा प्रस्ताव. ९ मार्च २०२२ रोजी हा करार करण्यात आला होता.आता हा करार मोडीत काढण्याबाबत अधिकृत पत्र आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
शेतकरी आणि सभासदांमध्ये आता एकच चर्चा रंगली आहे की,जर भागीदारी करार यशस्वी ठरला नाही तर त्यासाठी जबाबदार कोण? कारखान्याची आर्थिक परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे,पुढे कारखाना सहकार तत्त्वावर चालणार की खाजगीकरणाच्या दिशेने जाणार?कारण या सभेत केवळ करार रद्द करण्यावरच नव्हे, तर नवीन भागीदार निवडणे, अर्थसाहाय्य उभारणे इत्यादी बाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ८ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार आणि स्वारस्य अभिव्यक्ती प्रक्रियेनुसार कारखान्याला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा होणार आहे. एकेकाळी सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकरी चळवळीला हा निर्णय मोठा धक्का ठरू शकतो,अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सर्व सभासदांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.तसेच विविध संस्थांनी आपल्या अधिकृत प्रतिनिधींची नावे १५ मेपूर्वी लेखी स्वरूपात कारखान्याकडे सादर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या सभेत मोठ्या प्रमाणावर चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१८ मे रोजी होणारी ही सभा आता श्रीराम कारखान्याच्या भवितव्याचा आणि फलटणच्या सहकार राजकारणाचा निर्णायक दिवस ठरणार आहे.आता करार रद्द होणार का?नवीन भागीदार कोण असणार? की कारखाना खाजगीकरणाच्या दिशेने जाणार? याचा फैसला काही तासांतच होणार असल्याने संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष या सभेकडे खिळले आहे.











