राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यासह बारामती इंदापूर पुरंदर या चारही तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेला कांदा, भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दौंड तालुक्यातील पाटस, यवत, केडगाव, वरवंड, कुरकुंभ परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अर्धा ते एक तास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसराला गारपिटीने तडाखा दिला. निमगाव कितीचा परिसर हा भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांसाठी देखील प्रसिद्ध आहे. मात्र अचानक आलेला अवकाळी पावसाने या शेतीला मोठा फटका दिला.
बारामती पुरंदर दौंड आणि इंदापूर या चारही तालुक्यात शेतकऱ्यांनी कांदा शेतात काढून ठेवलेला व चाळीत साठवणुकीच्या तयारीत असलेला कांदा भिजल्याने सडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. परिणामी रब्बी हंगामातील कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर टोमॅटो, वांगी, मिरची, काकडी यासारखी वेलवर्गीय पिके पाण्यात आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याचे चित्र आहे.
वादळी वाऱ्यामुळे नव्याने लागवड केलेला ऊस व चारापिके आडवी झाली. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. कांद्याला भाव नसताना भाऊ वाढेल अशा अपेक्षेने कांदा चाळीत ठेवलेला कांदा आता नुकसानीत जाण्याची शक्यता आहे. एकीकडे भाव नाही आणि आता पावसाने उरलेसुरले पीकही वाया जाणार अशा दुहेरी संकटात सापडलो, अशी व्यथा शेतकरी संघटनेचे नेते भानुदास शिंदे यांनी मांडली.
शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. कृषी विभागाने व महसूल विभागाने तात्काळ पाहणी करून अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी शेतकरी करीत आहेत.दरम्यान, दुसरीकडे हवामान खात्याने पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.











