छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे एक अत्यंत भीषण आणि दुःखद घटना घडली आहे. शेतातील विहिरीचा कडा कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील बाप-लेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. ऐन उन्हाळ्यात विहिरीला पाणी लागल्याचा आनंद साजरा करणाऱ्या या शेतकरी कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव सर्जेराव काकडे (वय ४९) यांच्या शेतात गेल्या महिनाभरापासून विहिरीचे काम सुरू होते. ५० फूट खोल असलेल्या या विहिरीत २५ फुटांपर्यंत बांधकाम पूर्ण झाले होते. शनिवारी रात्री ९:३० च्या सुमारास विहिरीतील विद्युत पंप (मोटार) नादुरुस्त झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी बाजीराव काकडे आणि त्यांची दोन मुले श्याम (वय २२) आणि अजिनाथ (वय १६) विहिरीत उतरले होते.
काम सुरू असतानाच अचानक विहिरीचा मातीचा कडा ढासळला आणि तिघेही ढिगाऱ्याखाली गाडले गेले. विहिरीचे नवीन बांधकाम आणि मातीचा प्रचंड ढिगारा अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत पती आणि दोन्ही मुले घरी परतली नाहीत, म्हणून बाजीराव यांची पत्नी मीराबाई त्यांना शोधण्यासाठी विहिरीकडे गेल्या होत्या.
तिथे पोहचताच त्यांना विहीर खचलेली दिसली. आपल्या डोळ्यांसमोर संपूर्ण कुटुंब हिरावले गेल्याचे पाहून त्यांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या ओरडण्याने परिसरातील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी धाव घेतली. या घटनेत बाजीराव सर्जेराव काकडे (वय ४९ वर्षे) – वडील, अजिनाथ बाजीराव काकडे (वय १६ वर्षे) – मुलगा श्याम बाजीराव काकडे (वय २२ वर्षे) – मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. एकाच वेळी घरातील तीन कर्त्या पुरुषांचा अंत झाल्याने धानोरा गावावर शोककळा पसरली आहे.










