ज्ञानेश्वर रायते, बारामती.
मी तुम्हाला टर्मिनची इंजेक्शन आणि त्याचे तोटे सांगतोय.. तुम्ही मात्र ड्रगवरच ठाम रहायचं.. मी तुम्हाला मेंफेटर्मिन इंजेक्शन आणि त्याच्या व्यथा सांगेल.. तुम्ही मात्र नशाबाजीवर ठाम रहायचं.. मी तुम्हाला गावाच्या कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष द्यायला सांगेल, तुम्ही मात्र घरातील भविष्यातील धोक्यांवरच लक्ष ठेवायचं..
कारण आज बारामतीच नव्हे तर इंदापूर, दौंड, पुरंदरसह हवेली, मुळशी आणि पुणे शहरापर्यंत या नशेखोरीचा विळखा वाढलाय.. आजच्या समस्यांना नजरेत नजर रोखून छाताडावर आव्हान झेलून उत्तर देण्याची युवाची स्थिती निर्माण होण्यापेक्षा ते अशा नशेच्या माध्यमातून दररोजच्या संकटांपासून बाजूला पळण्याचा मार्ग शोधत आहेत…जो अत्यंत धोकादायक व दुर्देवी आहे.. ज्यांच्या खांद्यावर आपले उद्याचे भविष्य आहे असे आपण समजतोय..आणि ज्यांच्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस कष्ट करतोय.. ती भविष्यातील अपेक्षित असणारी आधाराची मजबूत फळी जर नशेच्या आहारी जाऊन तिरपी होणार असेल, तर काहीच उपयोग नाही..
मी तुम्हाला हा अत्यंत गंभीर विषय सांगतोय, जो अन्न पाणी आणि निवारा या मूलभूत गोष्टींपेक्षाही उद्या अधिक गंभीर आणि महत्वाचा असेल.. उद्याच्या वाईट काळाला सामोरे जाण्याआधीच जर नागरिक शक्ती या नशेखोरीला रोखण्यासाठी सामूहिकपणे वापरली तर उद्याचे धोके किमान थोडे तरी कमी करता येतील..
तर मंडळी विषय आहे आपल्या मुलांचा.. राम, कृष्ण, शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा ज्या राष्ट्रावर आजवर तरी अविरतपणे सावलीसारखा आहे आणि नव्या पिढ्या याच वैचारिकतेचा धडा जुन्या जाणत्यांकडून गिरवत मोठ्या होत आल्या.. समाजकारण करत आल्या.. जगत आल्या.. तिथे आता पुढच्या पिढ्यांसाठी मात्र कोणीतरी बेकादेशीर वाळूवर जगणारा भाई.. मटक्यावर उड्या मारणारा दादा.. किंवा खंडण्या वसूल करणारा डॉन आज आमच्या नव्या पिढीचा आयकॉन बनू लागला आहे. हे आयकॉन आता नवे धंदे शोधू लागलेत आणि तो धंदा आहे.. नशेच्या साम्राजाचा..! असे डॉन सामाजिक विण घट्ट ठेवणाऱ्या ग्रामीण भागाची सामाजिक विण उसवू लागलेत.. कशाच्या जोरावर? तर ड्रग्ज आणि नशेखोरीच्या जोरावर..!
वेळीच सावध होण्याची आता गरज आहे.. बारामतीसह आजूबाजूच्या भागात टर्मिनच्या इंजेक्शनपासून झालेली सुरवात बॉडी बिल्डींगसाठी मिळणाऱ्या प्रोटीनच्या इंजेक्शनच्या नावाखाली होणाऱ्या ड्रग्जपर्यंत पोचली आणि हळूहळू ड्रग्जच्या पार्ट्यांपर्यंत कधी पोचली ते कळलेच नाही. अत्यंत वेगाने हा धोका प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलाय.. आता हा ड्रग्जचा विळखा घरेच्या घरे बरबाद करू शकतो.. आग सोडा, धग पोचण्याच्या आधीच ती विझवली पाहिजे यासाठी जनमताचा रेटा उभारण्याची गरज आहे.
जातीपातीच्या पलीकडचा हा विषय आहे, त्याकडे सामूहिक संकट म्हणूनच पाहा.. या कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गोष्टींकडे प्रशासनाचे लक्ष वेधा.. त्यासाठी दबावगट निर्माण करा.. माझ्या एकट्याने काय होतय? या भ्रमात राहू नका.. एक जनआंदोलन किंवा सामाजिक जागृतीसाठीची चळवळ उभी राहीली नाही, तर येणारा काळ भयानक असेल.. अशावेळी आयेंगे कई घर आग की चपेटमें.. मेरा अकेला घर थोडी है? हे व्यक्त करण्याचा हलकटपणा करू नका.. जागे व्हा.. नशाखोरीविरोधात आता जुन्या पिढीलाही उभे राहावे लागेल.. आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी..!











