पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याच्या लाचकांडाने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल 28 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
विशेष म्हणजे, तोटेवारची दोनच दिवसांपूर्वी मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली होऊन बढतीही झाली होती आणि ती पुणे पोलीस दलातून कार्यमुक्तही झाली होती. तरीदेखील जाता जाता “शिल्लक माल गोळा” करण्याच्या प्रयत्नात ती एसीबीच्या जाळ्यात अडकली.
माहितीनुसार, एका आर्थिक गुन्ह्याच्या तपासात 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 2 लाख रुपये आधीच स्वीकारण्यात आले होते. उर्वरित 28 लाख रुपये एका खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारताना एसीबीने सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. ही लाच नेमकी कोणत्या प्रकरणासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी घेतली जात होती, याचा तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणाचे हात आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या आवारातच झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून, बदलीनंतरही भ्रष्टाचाराचा मोह सुटत नाही अशी चर्चा रंगू लागली आहे. मॅडमला दोन दिवसापूर्वीच बदली होऊन बढती मिळाली होती. पण त्यांना जाता जाता शिल्लक खरकटा माल गोळा करून जायचं होतं अशी चर्चा आता रंगली आहे.










