महावितरणकडून तत्काळ सुधारण्याचं आश्वासन..
कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या विरोधात आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आलं. ऐन कडक उन्हाळ्यात नागरिकांना सहन करावी लागणारी विजेची गैरसोय आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे संताप अनावर झाल्याने हे आंदोलन उभं राहिलं.

तालुक्यात तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत पोहोचलेलं असताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाडी-वस्त्यांवर सिंगल फेज वीजही उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेला थ्री-फेज वीजपुरवठा खंडित राहिल्याने उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान होत आहे.
जळालेले डीपी वेळेत बदलले जात नाहीत, कोटेशन भरूनही नवीन जोडण्या मिळत नाहीत, कमी दाबाने वीजपुरवठा होतो, तसेच ‘मागेल त्याला सोलर’ योजनेतील कामांमध्ये विलंब होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. चिलवडी आणि माही जळगाव उपकेंद्रांची प्रलंबित कामे रखडलेली असून ए.जी. फिडरवर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगमुळे अडचणींमध्ये भर पडत आहे.
या सर्व प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अखेर महावितरण प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं.
सायंकाळी ६ ते ९ दरम्यानचा खंडित पुरवठा पूर्ववत केला जाईल, तसेच अडचणीच्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता श्री. पवार यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असलं, तरी या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे आता कर्जत-जामखेडकरांचे लक्ष लागून आहे.
यावेळी रघुनाथ काळदाते, नामदेव राऊत, विश्वनाथ राऊत, विशाल म्हेत्रे, गुलाब तनपुरे, मंगेश आजबे, अमृत लिंगडे, प्रशांत राळेभात, रामशेठ कानगुडे, अनिल पांडुळे, दीपक शिंदे, विष्णू नाना मोंढळे, ज्ञानदेव लष्कर, वसीम सय्यद, किशोर तापकीर, राजेंद्र गोरे, सुनील उबाळे, बापू कार्ले, बाबासाहेब गांगर्डे, राजेंद्र पवार, मनोज गायकवाड, अमोल पाटील, बाळासाहेब सपकाळ, किसन ढवळे, संतोष निगुडे, बिबिशन धनवडे, रज्जाक शेख, वैभव काळे, राजेंद्र भांडवलकर, महादेव मोटे, डॉ. चंद्रकांत कोरडे, संदीप गांगर्डे, दत्ता साळुंके, गणेश चव्हाण, दादा राजे भोसले, विलास जगदाळे, रावसाहेब जाधव, सतीश चव्हाण, बजरंग डुचे, अशोक गीते, नय्युम शेख, दिलीप जाधव, महेश काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










