विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती तालुक्यातील मळद येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. येथील शेतकरी अनिल बापू कांबळे व गंगुबाई अनिल कांबळे यांच्या गट नंबर 183/15 मधील समाईक क्षेत्रातील सुमारे अर्धा एकर ऊस विद्युत तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाला.
मिळालेल्या माहितीनुसार,शेतातून गेलेल्या विजवाहिनीच्या तारांमध्ये गुरुवारी अचानक शॉर्ट सर्किट झाले. तारांमधून ठिणग्या पडून उसाच्या पिकाला आग लागली आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले.
आग लागल्यानंतर शेतकरी व परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.त्यामुळे उर्वरित ऊस वाचवण्यात काही प्रमाणात यश मिळाले.मात्र,अर्धा एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या घटनेमुळे महावितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.शेतातून जाणाऱ्या विजवाहिन्यांची नियमित तपासणी व देखभाल न केल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांच्या मते,अनेक ठिकाणी तार सैल झालेल्या किंवा झाडांना घासणाऱ्या अवस्थेत आहेत,तसेच काही ठिकाणी फ्यूज बॉक्स धोकादायक स्थितीत आहेत.मात्र संबंधित अधिकारी व लाईनमन याकडे दुर्लक्ष करत आहेत.
नैसर्गिक संकटे, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला असताना अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे त्याचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने योग्य ती खबरदारी घ्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान,या घटनेची दखल घेऊन संबंधित विभागाने पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.










