हिंगोली : महान्यूज लाईव्ह
हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्यात नव्याने दाखल झालेल्या शासकीय वाहनांच्या पूजेसाठी एका स्वामींना (बाबा महाराज) निमंत्रित करण्यात आल्याची घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.
सरकारी यंत्रणेमध्ये धार्मिक विधींचा सहभाग झाल्याने या प्रकरणावरून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत असून पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बासंबा पोलीस स्टेशनमध्ये नुकतीच नवीन वाहने दाखल झाली होती. या वाहनांच्या पूजेसाठी पारंपरिक पद्धतीने विधी पार पाडण्यात आले.
मात्र या पूजेसाठी पोलीस अधिकाऱ्यांऐवजी एका मठातील बाबा महाराजांना बोलावण्यात आले. त्यांच्या हस्ते नारळ फोडणे, फुले अर्पण करणे आणि धार्मिक मंत्रोच्चारासह वाहनांचे पूजन करण्यात आले. या घटनेला आणखी वळण मिळाले ते म्हणजे संबंधित स्वामींनी पूजेनंतर या नव्या वाहनांची टेस्ट ड्राइव्ह केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडिओमुळे प्रकरण अधिक चर्चेत आले असून सरकारी गाडीवर आधी सेवा की श्रद्धा असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकारावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी सरकारी संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षतेचा भंग झाल्याची टीका केली आहे. पोलीस ठाणे हे कायद्याचे मंदिर असताना तिथे धार्मिक विधींचे प्रदर्शन योग्य आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे. तर काहींनी हा फक्त परंपरेचा भाग असल्याचे सांगत या कृतीचे समर्थन केले आहे.
दरम्यान या घटनेमुळे पोलीस प्रशासन अडचणीत आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी यंत्रणेमध्ये धार्मिक हस्तक्षेपाची मर्यादा काय असावी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.










