वन्यप्रेमींकडून कारवाई ची मागणी!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस परिसराला लागून असलेल्या वनक्षेत्रात शिकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅरावान हाउंड म्हणजेच मुधोळ जातीच्या कुत्र्याचा वावर वाढला असून वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचा संशय वन्यप्रेमींकडुन व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकारामुळे वनविभागाने तत्परतेने दखल घेऊन या प्रकाराबात सखोल चौकशी करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाटस नजीकच्या मोकळ्या माळरान आणि वन विभागाच्या हद्दीतील झुडपी जंगलात काही स्थानिकांकडून रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी कॅरावान हाउंड जातीचे कुत्रे सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. काही नागरिकांना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत हा कुत्रा रात्रीच्या सुमारास वावरताना दिसुन आला. यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हे कुत्रे अतिशय चपळ आणि वेगवान असून हरीण, ससा, रानडुक्कर, भेकर व मोर यांसारख्या वन्यप्राण्यांची शिकार करतात.
मागील काही दिवसांपासून पाटस, रोटी, हिंगणीगाडा, गिरीम, कुसेगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील वन हद्दीत उंच पाय, सडपातळ आणि लांबट आणि निमुळते तोंड असलेले कुत्रे दिसून आले आहे. त्यामुळे हा कुत्रा खास वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी काहींनी या परिसरात सोडले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे.
कॅरावान हाउंड का धोकादायक?
कॅरावान हाउंड हा भारतीय बनावटीचा शिकारी कुत्रा आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात याला मुधोळ हाउंड म्हणतात. याचा वेग ताशी 60 किमी पर्यंत असतो. एकदा सावजाचा माग घेतला की तो सोडत नाही. त्यामुळे वन्यजीवांना जीव वाचवणे कठीण होते. अशी माहिती वन्य प्रेमींनी दिली.
वनविभागाने कठोर पावले उचलावीत
याबाबत दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे, शिकारीसाठी कुत्र्यांचा वापर करणे बेकायदेशीर असुन या प्रकारामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिकारीमुळे वनक्षेत्रातील वन्यजीव प्राण्यांच्यी संख्या कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या शिकारी कुत्राचा शोध घेऊन संबंधितांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी वन्य प्रेमींकडुन होत आहे. तसेच वनक्षेत्रात ड्रोनच्या मदतीनेही पाळत ठेवावी अशी मागणी ही होत आहे.
दरम्यान, काही हौशी लोक शिकार करून मांसविक्री करतात. यामुळे पाटस परिसरातील वनक्षेत्रातील वन्य जीव प्राण्यांची संख्या कमी होत आहे. वनविभागाने कायमस्वरूपी पथक नेमावे’, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वनक्षेत्रात संशयास्पद हालचाल किंवा शिकारीचा प्रकार दिसल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.











