तांदुळवाडी एलसी लेक परिसरातील थरारक घटना; मुख्य आरोपी अटकेत, दुसरा साथीदार अद्याप फरार
बारामती : महान्यूज लाईव्ह
तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात प्रेमी युगलावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला तब्बल दहा महिन्यांच्या तपासानंतर बारामती तालुका पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली असून, या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
या घटनेने त्या वेळी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील २२ वर्षीय तरुण (नाव बदललेले) आपल्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील निर्जन ठिकाणी बसला होता. याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रूमाल बांधून अचानक त्यांच्यावर धाडसी हल्ला चढवला.
हल्लेखोरांपैकी एका आरोपीने तरुणाकडे मोबाईल व रोख रक्कम देण्याची मागणी केली. मात्र तरुणाने विरोध करताच आरोपीने हातातील लोखंडी कोयता काढत त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर व मांडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. भीतीचे वातावरण निर्माण करून आरोपींनी त्याच्याकडील २,५०० रुपये रोख रक्कम आणि पोको कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला.
यावरच न थांबता आरोपींनी तरुणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर त्यांनी पीडितांच्या मोटारसायकलची चावीही काढून घेत घटनास्थळावरून पळ काढला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला आरोपींचा कोणताही ठोस मागमूस लागत नव्हता. मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहितीदारांचे जाळे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. अखेर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजय नंदकुमार सकट (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याची ओळख पटली.
१५ एप्रिल २०२६ रोजी पोलिसांनी सापळा रचून अजय सकट याला अटक केली. अटकेनंतर त्याच्याकडून ४.९०० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून, लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, तसेच पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, नितीन ढवाण, निलेश वाकळे, राजू बन्ने आणि शाहरुख शेख यांच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करीत आहेत.










