महान्यूज : लाईव्ह नाशिक
शहरात अलीकडेच घडलेल्या अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता कॉर्पोरेट क्षेत्रालाच हादरवून सोडणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील एका नामांकित आयटी (IT) कंपनीत काम करणाऱ्या 18 ते 25 वयोगटातील तरुणींवर लैंगिक, मानसिक छळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी टीम मॅनेजरसह एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात संतापाची लाट उसळली असून कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तब्बल 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित आयटी कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत तरुणींना जाळ्यात ओढले. करिअर बिघडवण्याची भीती दाखवून तसेच नोकरीवर परिणाम होईल असा दबाव टाकून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
यामध्ये केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर मानसिक छळही मोठ्या प्रमाणावर झाल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचाही गंभीर मुद्दा समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे अनेक तरुणी मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे.
प्रकरणाची व्याप्ती मोठी; SIT स्थापन
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे समोर येत असून 20 ते 25 तरुणी या प्रकाराला बळी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.
संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील हे पथक कंपनीतील अंतर्गत व्यवहार, इतर वरिष्ठांचा संभाव्य सहभाग आणि संपूर्ण साखळीची चौकशी करत आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपी असून त्यात 5 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पाच पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून महिला आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांसाठी असलेले नियम आणि संरक्षण यंत्रणा कितपत प्रभावी आहेत, याबाबतही शंका उपस्थित होत आहेत. नाशिक पोलिसांनी पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले असून, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
तसेच अशा प्रकारच्या छळाला बळी पडलेल्या इतर महिलांनीही न घाबरता तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही घटना केवळ एका कंपनीपुरती मर्यादित नसून संपूर्ण कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. आता या प्रकरणात पुढे काय उलगडते आणि दोषींवर किती कठोर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











