पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सोमवारी (६ एप्रिल) हडपसर येथील बी.टी. कवडे रोड परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे तसेच कनिष्ठ सहाय्यक अनिल पोपट रंधवे आणि अतिश केरू शिंदे यांना तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तिघांनाही ताब्यात घेऊन वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीमुळे उघडकीस आला प्रकार
या प्रकरणी ३६ वर्षीय शिक्षण सेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रारदार जिल्हा परिषदेत कार्यरत असून त्यांना उपशिक्षक पदावर पदोन्नती हवी होती. यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
नियमबाह्य कामासाठी पैशांची मागणी
धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसतानाही त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून सर्व सेवा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बेकायदेशीर कामासाठीच आरोपींनी मोठ्या रकमेची मागणी केली होती.
आधीच घेतले होते २५ हजार रुपये
तपासादरम्यान आरोपींनी सुरुवातीला २५ हजार रुपये घेतल्याची कबुली दिली. उर्वरित २ लाख ७५ हजार रुपयांसाठी तक्रारदारावर सातत्याने दबाव टाकला जात होता. अखेर तक्रारदाराने ACBकडे धाव घेतली. ११ फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर ACBने सापळा रचला. ६ एप्रिल रोजी हडपसर परिसरात अनिल रंधवे आणि अतिश शिंदे यांनी २.७५ लाख रुपये स्वीकारताच ACBच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर मुख्य सूत्रधार राजेश खंदारे यांनाही अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या घोटाळ्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील गैरव्यवहार पुन्हा एकदा समोर आला असून, प्रशासनातील भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.











