विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या विजेच्या गंभीर समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत असून,गावठाण फीडर वगळता वाड्या-वस्त्यांवर दररोज तब्बल चार तास अतिरिक्त भारनियमन करण्यात येत आहे.या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
महावितरणकडून ज्या गावांमध्ये शेतीपंप नाहीत,त्या गावांना ‘गावठाण फीडर’ म्हणून सलग वीजपुरवठा केला जात आहे. मात्र शेतीपंप असलेल्या भागांतील वाड्या-वस्त्यांना सायंकाळच्या महत्त्वाच्या वेळेत भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.
विशेषत शेतीपंप असलेल्या भागात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ‘फोर्स लोडशेडिंग’ केले जात आहे. दिवसभर शेतीपंपासाठी वीजपुरवठा केला जात असला तरी तोही अनेकदा खंडित होतो. परिणामी, दिवसभर विजेच्या लपंडावाला कंटाळलेल्या नागरिकांना सायंकाळीही अंधारात वेळ काढावा लागत आहे.
सायंकाळचा काळ हा ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. याच वेळेत जनावरांना चारा-पाणी देणे, दूध काढणे, स्वच्छता राखणे, दळण दळणे, स्वयंपाक व जेवण यांसारखी कामे केली जातात. मात्र विजेअभावी ही सर्व कामे अडचणीत येत असून महिलांसह शेतकरी कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे.
याशिवाय, सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षा काळ सुरू असल्याने भारनियमनाचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे.सायंकाळच्या अभ्यासाच्या वेळेत वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या आठवड्यापासून हा अतिरिक्त भारनियमनाचा प्रकार सुरू असतानाही प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.स्थानिक नेते व विविध संस्थांचे पदाधिकारीही याबाबत शांत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी अधिकच वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर “हे अतिरिक्त भारनियमन आणखी किती दिवस सहन करावे लागणार?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वाढत्या त्रासामुळे वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.











