नाशिक : महान्यूज लाईव्ह
नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरण अधिकच गडद होत चालले असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे धक्कादायक तपशील उघड होत आहेत. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्या तिन्ही तक्रारींमधून एका विकृत पद्धतीने महिलांचे शोषण केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकासोबतच आयकर विभागानेही लक्ष घातले असून, खरातच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ लैंगिक अत्याचारच नव्हे, तर महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. धार्मिक विधी, तांत्रिक पूजा आणि दैवी शक्तींचा बनाव करून महिलांचा विश्वास जिंकला जात होता आणि त्याचाच गैरफायदा घेत अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पहिल्या प्रकरणात 2022 ते 2025 या कालावधीत एका महिलेला सतत मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. स्वतःला दैवी अवतार असल्याचे सांगत, मागील जन्माच्या कथा रचून आणि अघोरी विधींचा आधार घेत महिलेला भीतीच्या छायेत ठेवण्यात आले. कार्यालयात बोलावून तिच्या पतीला बाहेर थांबवणे, गुंगी आणणाऱ्या पदार्थांचा वापर करणे आणि धमक्यांच्या जोरावर अत्याचार करणे, असे गंभीर आरोप या तक्रारीत नमूद आहेत.
दुसऱ्या घटनेत एका गर्भवती महिलेला मुलगा होईल, असे सांगून फसवण्यात आले. पूजाविधीच्या नावाखाली वारंवार अत्याचार केल्याचा आरोप असून, कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. अघोरी प्रकार दाखवून आणि धार्मिक भीती निर्माण करून पीडितेला गप्प ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तिसऱ्या प्रकरणात घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींचा फायदा घेत, “मी अवतारी पुरुष आहे” असे सांगत विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तांत्रिक विधींच्या नावाखाली वारंवार शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर महिला गर्भवती झाल्यानंतर गर्भपातासाठी औषध देण्यात आल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे.
या तिन्ही प्रकरणांमधून एक समान धागा स्पष्ट दिसतो, तो म्हणजे धार्मिक अंधश्रद्धा, भीती आणि खोट्या दैवी शक्तींचा आधार घेत महिलांना जाळ्यात ओढणे आणि त्यांचे शोषण करणे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, तपास यंत्रणांसमोर आणखी मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











