काटेवाडी – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंदापूर व बारामती तालुक्यात दहशत पसरवलेली बिबट्याची मादी आज काटेवाडीत जेरबंद झाली. काल तिने पिंजऱ्यालाही चकवले होते. मात्र आज पहाटे ती जेरबंद झाल्याने काटेवाडी, कन्हेरीवासियांसह इंदापूर व बारामतीच्या वेशीवरील गावांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बिबट्या दोन होते अशी माहिती वनविभागाकडून दिली जात असल्याने हे दोनही बिबटे सापडले पाहिजेत अशी नागरिकांची भावना होती. त्यातच 30 जानेवारी रोजी पहिला बिबट्या सापडल्यानंतर मादी आक्रमक झाली होती. या काळात तिने जवळपास सहा जनावरांना लक्ष्य केले होते. त्यामुळे परिसरातही पहिल्यापेक्षा अधिक भीती पसरली होती. त्याचा विचार करता आज पहाटे संतोष जाधव यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात मादी सापडताच शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि 9 डिसेंबरपासून सुरू असलेले शेतकरी अप्रत्यक्ष ओलिसनाट्य आज पहाटे संपले. अर्थात अजूनही नागरिकांना बिबट्या, तरस किंवा लांडग्यांचा संशय असल्याने बारामती व इंदापूर तालुक्यातील लोकांमध्ये भीती आहेच, त्या पार्श्वभूमीवर वन विभागाने अफवा न पसरवता दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे. कोठेही कोणत्याही प्रकारचा वन्यजीवाचा वावर असल्याचा संशय आल्यास, अथवा कोणी पाहिल्यास त्यांनी वनखात्यास प्रथम कळवावे असे आवाहनही तालुका परीक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांनी केले आहे.










