राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाच दिवस उलटले आहेत. पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाचे लक्ष वेधले!
दौंड तालुक्यातील कानगाव येथील विठ्ठल मंदिरात १८ सप्टेंबर पासुन कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळवा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलक शेतकरी आक्रमक झालेले दिसून आले.
शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत तीव्र घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला.
कष्टकरी शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नाही व पावसाने सुद्धा कहर केला आहे. त्याचप्रमाणे वखारीतला कांदा खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून शेतकरी आता आक्रमक झाला आहे. कारण शासनाचे शेतकऱ्यांच्याकडे लक्ष्य नाही. असा आरोप आंदोलक करीत आहेत.
ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीमालाच्या बाजारभावावर अवलंबून असते. शेतीला बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना मुलांची शिक्षणाची फी,कर्ज, दवाखाना खर्च व शेतीसाठी नवीन भांडवलासाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आर्थिक आणीबाणी तयार झाली आहे. यासाठी शासनाने त्वरित योग्य पावले उचलली नाही, तर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश होऊन राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे राहील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे शासनाने वेळीच शेतकऱ्यांच्या मागण्याकडे व कर्जमुक्ती कडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज झालेल्या या अर्धनग्न आंदोलनात भानुदास शिंदे, भाऊसाहेब फडके, रामदास पवार, दादासो गवळी, नानासाहेब नलवडे, नानासाहेब कोऱ्हाळे, राजेंद्र मोरे ,संतोष गायकवाड, सुरेश फडके, किसन चौधरी, नानासाहेब फडके, डॉ. बापूराव फडके, दुर्गादास मुळीक, राजेंद्र कोंडे, दत्तात्रय मोरे ,मच्छिंद्र गवळी, बाळू गवळी ,मारुती कोंडे आदी आंदोलक शेतकरी सहभागी झाले होते.











