यंदा मे महिना येण्यापूर्वीच उन्हाची लाहीलाही हैराण करून सोडत आहे यंदा देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद महाराष्ट्रात झाली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नेहमीच नोंद होत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 45.6°c ची काल नोंद झाली.
यंदा महाराष्ट्र खूपच तापला आहे. गेल्या तीन वर्षात किमान तापमान सरासरी 22 ते 23 अंश सेल्सिअस पर्यंत असायचे, ते आता 26 ते 27 अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे वातावरणातील कोरडेपणा वाढून उन्हाचा रखरखीतपणा वाढला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामे झाली. विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झालेली झाडांची तोड हे देखील तापमान वाढण्यासाठी कारणीभूत ठरले आहे.
तशी अजून उष्माघाताने दगावलेल्यांची संख्या वाढलेली नाही, मात्र दवाखान्यांमध्ये उष्माघातामुळे त्रास होणारे रुग्ण वाढू लागले आहेत. उष्णतेच्या काहीली पासून वाचण्यासाठी अनेक पर्याय नागरिक आखत आहेत. दरम्यान वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना संपूर्ण अंग झाकून जाईल अशा पद्धतीचे पेहराव करावेत. डोळ्यावर सनगॉगल्स चा देखील वापर करावा, भरपूर पाणी प्यावे असे आवाहन तज्ञांनी केले आहे.











