तीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळताच नवी प्रेरणा घेण्याऐवजी जुन्यातच डोकं खुपसायची वृत्ती असते त्यालाच अंधभक्त म्हणतात. मुघलांच्या काळातील राजधानी असलेल्या बुऱ्हानपूर येथे सध्या काय चाललंय? औरंगजेबाच्या या आर्थिक राजधानीत सध्या असंख्य लोक एकत्र येऊन सोन्याची नाणी शोधत आहेत.
बुऱ्हाणपुर नजीकच्या असिरगड गावात कोणीतरी ही अफवा उठवली आणि हजारो लोक सोने शोधण्यासाठी या गावात धावले. छावा सिनेमात मराठ्यांनी बऱ्हाणपूर लुटले आणि त्याचा खजिना असिरगड या किल्ल्यात ठेवला असे फक्त दाखवले काय, कोणतीही खातरजमा न करता हा सिनेमा पाहिल्यानंतर खजिना इथे मिळेल अशा अफवेतून लोकांनी शेतपिके तर खणलीच, पण रस्त्याच्या रस्तेही खणले आहेत.
फक्त दिवसाच नाही. रात्री देखील डोक्यावर टॉर्च असलेली टोपी घेऊन अनेक लोक जमीन खोदून चाळणीतून माती चाळत आहेत. अर्थात स्थानिक लोकांच्या मते फक्त छावा हे त्यासाठी पुरेसे कारण नाही, तर इथे महामार्गाचे काम सुरू आहे. काही संपूर्ण येथील काम करणाऱ्या कामगारांना रस्त्याच्या कामामध्ये उकरल्यानंतर मातीत सोन्याची नाणी सापडली. त्यामुळेच पूर्वीची सोन्याची नाणी आता सापडत असल्याची अफवा जास्त वेगाने पसरली. असेही सांगितले जात आहे.
एक कारण मात्र निश्चित, छावा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आणि बुऱ्हानपूर ही मोगलांची राजधानी होती. मोगल सैनिक युद्धावरून आल्यानंतर लुटलेला खजिना जमिनीत खड्डा खोदून काढायचे. त्यामुळेच या गाडलेल्या जमिनीतून आता सोन्याची नाणी मिळत आहेत असे वाटल्याने हा जमाव सध्या सोन्याच्या शोधात वेड्यासारखा खणत सुटला आहे.











