पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात राहत असलेल्या मूळच्या सोलापूरच्या तरुणाला जीबी सिंड्रोम आजारामुळे आपला जीव गमवावा लागला. या तरुणाला काही दिवसांपूर्वी जीबी सिंड्रोम ची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. अतिदक्षता विभागातून तो बाहेरही आला, परंतु पुन्हा श्वसनाचा त्रास होऊन त्याचा अचानक मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसात अत्यंत वेगाने पुण्यामध्ये जीबी सिंड्रेला आजाराचे रुग्ण वाढत आहेत. सुरुवातीला एकाच दिवसांमध्ये 22 रुग्ण आढळले आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र त्यानंतर हे रुग्ण वाढतच गेले. तीन दिवसांपूर्वी ही संख्या 59 वर पोचली होती, तर आता ती 73 वर पोहोचली आहे. यातील काहीजण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
पुण्यातील न्यूरोलॉजिकल सोसायटीने या संदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने देखील अहवाल दिला आणि शौचावाटे आढळलेल्या बॅक्टेरियानुसार पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. अर्थात अनेक ठिकाणी हे रुग्ण आढळले असल्याने अनेक ठिकाणचे पाणी दूषित झाल्याचे यातून समोर आले असून, अनेक ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये एकाच वेळी जीबी सिंड्रोम आजाराला आमंत्रण देणारा बॅक्टेरिया आढळून आला आहे.











