मिशन अॅडमिशन : हेमचंद्र शिंदे, बारामती.
देशपातळीवरील नीट परीक्षा यशस्वी पार पडली. आता पुढील टप्पा काय? हा प्रश्न अनेकांना पडला असेलच, तर पालक व विद्यार्थी मित्र हो, ज्यांनी परीक्षा दिली, त्यांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध होतील. हा पहिला टप्पा असून त्यावर हरकत घेण्याची सोय आहे. दुसऱ्या टप्प्यात उत्तरपत्रिका (की अॅन्सरशीट) जाहीर केली जाईल. आक्षेप नोंदवून झाल्यानंतर मग अंतिम उत्तरे जाहीर करून नीटचा निकाल जाहीर केला जाईल.
आपल्याला सतत प्रश्न पडतो की, निकालाला पुढील महिना लागू शकतो. तर तसे होणार नाही. कारण पाठीमागे अगदी मागील वर्षीपर्यंत मे च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होत होती व जूनच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल लागायचा. त्या कालावधीत अगोदर निकाल लावून उपयोग नव्हता. कारण बारावीचे निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होत होते. कोरोनाच्या महामारीत आता मात्र बारावीचे निकाल जाहीर होऊन कालावधी उलटला आहे. त्यामुळे काळजी करू नका, नीटचा निकाल लवकर जाहीर होईल.
एनटीए (नॅशनल टेस्टींग एजन्सी)ने परिक्षा घेतली. आता निकालानुसार ऑल इंडिया रॅंकींग देण्याची त्यांची जबाबदारी आहे. तो स्कोअर आयुषकडे वर्ग करण्याचीही त्यांचीच जबाबदारी आहे. यामधूनच प्रवेशासाठी प्रत्येक राज्ये तो स्कोअर वापरतात. देशपातळीवर आयुषतर्फे १५ टक्के सरकारी कोटा, १५ टक्के खासगी कोटा व डिम्डचा १०० टक्के कोटा हा एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस प्रवेशासाठी वापरला जातो.
याचा व्हिडीओ इथे पाहू शकता किंवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता.
राज्यातील परिस्थिती
पहिल्यांदा राज्यातर्फे नोटीफीकेशन काढले जाईल. रजिस्ट्रेशन हा दुसरा टप्पा असेल. जरी दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असली तरी पात्र जे विद्यार्थी होतील, त्यापैकी इच्छुक उमेदवारंकडून नावनोंदणी केली जाते. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाते. हा टप्पा राज्याच्या अनेक भागात दरवर्षी केला जात होता. तो समोरासमोर होत होता. यावर्षी मात्र कदाचित कोरोनामुळे थेटपणे कागदपत्रांची तपासणी होणार नाही, शक्यतो ज्याप्रमाणे पीजीची अॅडमिशन्स होतात, त्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रवेश घेताना ती तपासणी होईल.
राज्याचा मेरीट क्रमांक आल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. एक लक्षात घ्या, कोणताही प्रवेश हा मेरीट क्रमांकानुसार होणार आहे. उदाहरणार्थ – सन २०१६ मध्ये १८०० पर्यंत मेरीट क्रमांकावरील विद्यार्थ्याला प्रवेश मिळत होता. असे धरले तर, ज्याचा १८०० मेरीट क्रमांक होता, त्याला ३७० गुण मिळाले होते. सन २०१७ मध्ये १८०० मेरीट क्रमांकाच्या विद्यार्थ्याला ४७८ गुण होते. मग ४७८ गुणाच्याच विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार असे मानायचे का? तर तसे नाही. हे का होते, तर प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी अधिक होती. मागील वर्षी १८०० व्या मेरीट क्रमांकाचे गुण ५५५ होते. अॅडमिशन ५५५ गुणाला बंद नाही झाले. त्या १८०० क्रमांकालाच बंद झाले हे लक्षात घ्या.
यंदा ७० व ३० एकत्र झाले असले तरी २००० ते २१०० मेरीट क्रमांक मिळवणारा विद्यार्थी अगदी शेवटच्या क्षणी शासकीय एमबीबीएसचा प्रवेश मिळवू शकेल. ६५०० मेरीट क्रमांक असलेला विद्यार्थी खासगी महाविद्यालयातील एमबीबीएसचा प्रवेश मिळवू शकेल असे वाटते.
हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक व संचालक सेंटर फॉर करिअर गायडन्स, बारामती. लेखकाला इथे संपर्क साधू शकता – ९४०५१११५५५











