नांदेड : महान्यूज लाईव्ह
नांदेडच्या विष्णूपुरीतील डॉक्टर शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 48 तासात 31 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये 16 नवजात बालकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये दोन नवजात बालकांचा समावेश आहे.
रुग्णांच्या बळीच्या सत्रामुळे राज्य सरकारवर मोठी टीकेची झोड उठली असून, याची गंभीर दखल केंद्र सरकारने देखील घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीच्या सूचना केल्या आहेत. हे मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाले, याचा शोध घेण्यासाठी मंगळवारी नांदेड मधील विष्णुपुरीतील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राज्य सरकारची समिती देखील दाखल झाली होती.
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाला बाहेरच्या रुग्णालयातून पाठवलेले रुग्ण यामध्ये अधिक होते अशी माहिती या रुग्णालयाच्या सूत्राने दिली असली तरी या रुग्णालयात देखील रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे विकत आणण्यास सांगितले जात आहेत असे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान हिंगोली चे एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड मधील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी भेट देऊन तेथील अस्वच्छता पाहिली. खासदार पाटील यांनी या रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर एस. आर. वाकोडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांना स्वच्छतागृहाची साफसफाई करायला लावली. या घटनेबद्दल पदवी आणि पदवीधर च्या विद्यार्थ्यांनी काळा पिती लावून निषेध केला, अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील निषेध केला, परंतु सामान्य लोकांनी मात्र या घटनेचे स्वागत करत अधिकाऱ्यांना अशाच स्वरूपाची वागणूक द्यायला हवी असे देखील मत व्यक्त केले.











