दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड आगारातून प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी.बसेस पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. दौंड ते स्वारगेट, दौंड ते नगर, दौंड ते सिध्दटेक, दौंड ते बारामती असा नियमित फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती आगारप्रमुख रामनाथ मगर यांनी दिली.
राज्य परिवाहन विभागाने जिल्ह्याबाहेर एस.टी.बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद असलेल्या एसटी बसेस पुन्हा एका रस्त्यावर धावू लागल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात दौंड तालुक्यातील ग्रामिण भागातील अनेक प्रवासांची मोठी गैरसोय होत होती. तसेच मागील पाच ते सहा महिन्यापासून या एसटी बसेस दौंड आगारात उभ्या आहेत. मात्र आता एस.टी.बसेस रस्त्यावर प्रवासाच्या सेवेसाठी धावणार आहेत.
सध्या दौंड आगारातून दौंड ते बारामती दिवसभरात चार बसेस चालु करण्यात आल्या आहेत. तर दौंड ते नगर व दौंड ते स्वारगेट आणि दौड ते सिध्दटेक मुक्कामी बस सुरू करण्यात आली आहे. दौंड वरून पुण्याकडे स्वारगेट बस ही सकाळी सात वाजता दौंड डेपोतून निघते.यामुळे सध्या तालुक्याच्या बाहेर व जिल्हयाच्या बाहेर एस.टी बसेस सुरू करण्यात आली आहे.
चौफुला ते बारामती एक एसटी बसेस मध्यंतरी सुरू केली होती. ती मात्र प्रवाशी नसल्याने बंद करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांची मागणी आल्यास चौफुला ते बारामती एस.टी सुरू करण्यात येईल. तसेच दौंड ते मलठण व दौंड ते भिगवण या मार्गावर पुरेशा प्रमाणात प्रवाशी नसल्याने या मार्गावरील एस.टी. बस बंद करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरील गावांची मागणी आल्यास या बसेस ही सुरू करण्याचा विचार केला जाईल असेही मगर यांनी सांगितले.










