नानाची टांग
(मथुरेचा बाजार पूर्वीही भरत होता..अन आताही.. पण कालौघात कित्येक पिढ्या गेल्या…कित्येक वर्षे सरली..कृष्ण मात्र अजूनही त्याच भूमिकेत आहे…आज तर गोकुळाष्टमी…मग कृष्णाने हाच मुहूर्त साधला..आपल्याच नावाने साजऱ्या होणाऱ्या या सणादिवशी आपण गवळणी अडवायच्या असं त्याने ठरवले अन त्यांचं आज काय चाललंय हे जाणून घ्य़ायचं ठरवलं…. खरोखरंच काही अंतरावरून गवळणी चालत येत होत्या..नेहमीप्रमाणे किसनदेव रस्ता अडवून थांबले..)
किसनदेव – अगं..हो..हो..हो.. एवढ्या लगबगीनं कुठं चालला गं..
पहिली गवळण – कोण रं तू भुसनळ्या.. कोळशाच्या खाणीतनं थेट इकडंच आलास व्हयं..
किसनदेव – ऑं? मला ओळखलं नाय तुमी…मला ओळखलं नायी..?
दुसरी गवळण – का रं बाबा…तु मोठा उद्योगपती..का मुख्यमंत्री, का पुढारी?… का विकास दुबेचा भाऊ….तवा तुला ओळखायला?
किसनदेवा – ऑं..अगं … मला ओळखलं नायी..मला ओळाखलं नायी…मी साक्षात किसनदेव….यादव…
तिसरी गवळण – यादव का जाधव आमी नाय वळखत.. हु लांब…यादव म्हणशीला तर मनसे कार्यक्रम करू…आणि जाधव म्हणला तर जै म्हाराष्ट्र…
किसनदेवा – अरे..अरे.. तुमच्यात या कलीयुगानं फारच फरक केला बुवा…थांबा, मी पेंद्या, वाकड्या, सुदाम्या सगळ्यांनाच बोलावून घेतो थांबा..(हाक मारतो..)
सुदाम्या… कोण रं तू?
किसनदेवा – ऑ..च्यामारी.. तुझीपण तीच गत..
सुदाम्या – ओहो..सॉरी..सॉरी देवा… ओळखलंच नायी वं या गॉगलमधून…इम्पोर्टेड आहे ना…अमेरिका…ते आपली अमेरिका नाय का..तिथून आणला..
किसनदेवा – सुदाम्या, आता तू काय करतो रं इथं..
सुदाम्या – देवा..सुदाम्या नाय बोलायचं…सुदामरावसाहेब असं म्हणायचं…तुमी गेला, मग दुधाचा बिझनेस कुणी सांभाळायचा… मग मीच सांभाळला आजपतोर…ह्या साऱ्या गवळणी आपल्याच ठेल्यावर दुध घालायला निघाल्यात…
किसनदेवा – म्हणजे मथुरेला नाही?
सुदाम्या… मथुरा?…ती आता कुठं राहीली देवा..तिथं एवढ्या लांब गवळणी कशा जात्याल.. तिथं आपलं किसनदेव पॅकींगचं दुध जातंय…देवा तुम्ही गेला..पण तुम्ही द्वापारयुगात जो हात आपल्या डोक्यावर ठेवला होता ना…म्हणून तुमच्या नावानंच आपण पॅकींगंच ब्रॅण्ड आणलंय…खपतंय बी दणादण…३.५ चं पॅकींग असतंय…आतमध्ये कोन बघतंय देवा… ३.० चं हाय का, ३.५ चं…? आन आता दुध गोळा करायला आता जागोजागी दूध संकलन केंद्रं झालीत देवा… हायसा कुठं?..
किसनदेवा – म्हणजे सुदाम्या.. सॉरी सुदामरावसाहेब..काय म्हणायचंय काय तुला..?
सुदाम्या – आंग अशी.. यारं पट्ट्या… बरं झालं ओळाखलं.. देवा.. आता तुमचं काम कवाच संपलं…पर आता कवाबी म्हणायचंच नाही…`माझ्या दुधात नाही पाणी…`
किसनदेवा – अरं..बाबांनो, आमच्या काळात नव्हतंच दुधात पाणी..!
पहिली गवळण – देवा, काय घेऊन बसलासा, पाण्याचं! पहिलं दुधात पाणी नसायचं..आता पाण्यात दुध असतंया… आमच्या वस्तीवरचं पोरगं एका दुध संकलन केंद्रात काम करतं….पाच हजार लिटर दुधाचं सहा हजार लिटर करतं… कसलं सिंथेटिक…बिंथेटिक असली नावं त्यांच्या तोंडात असत्याती.. पाणी कसलं घेऊन बसलायसा देवा..म्हणे सिंथेटिक दुध असतंय वाटतं… एका दिसाचं १० हजार घिऊन येतंय घरी…
किसनदेवा – अरेरे… अरे तुम्ही केवढं पाप करता आहात… दुधाचा धंदा एवढा पवित्र…तुम्ही अशाप्रकारे नासवता?
सुदाम्या – देवा, मला एक सांगा…वाकड्या आता काय करंत असंल…त्याच्यापशी तुम्ही असताना काय व्हतं तेव्हा..
किसनदेवा – मग..
सुदाम्या.. आता ५ हजार कोटींचा मालक हाये…चार मर्सिडीज बेंझ हायेत…दुधाच्या जीवावर धनवान झाला हो तो..
किसनदेवा – अरे व्वा….दुधाच्या पैशावर एवढं धन मिळत असेल तर चांगलंचंय की..मग प्रजाही चांगलीच सुखी असेल नव्हं…
पहिली गवळण – तर…लय बेस हाये… दहा जनावरं आन देवा १८ रुपये लिटरला भाव हाये..आम्ही दुध काढून काढून..शेण काढून काढून खपतोय… आन यांचं आपलं बरं चाललंय… देवा तुम्ही द्वापारयुगात मथुरेच्या बाजाराला जाताना माठाला खडं मारायचा..पण त्यात पवित्रता होती…गोकुळातली मुलं धष्टपुष्ट व्हावीत…गोकुळ सुखासमाधानानं भरून जावं हा तुमचा हेतू.. पण आता आमच्या माठाला खडं मारणारं भामटे बनलेत.. राजेमहाराजांबरोबर उठबस करत्यात…महाराज पण मग त्यांचंच भलं बघतो…देशात देवा दररोज दुध उत्पादन होतं, ते १५ कोटी लिटर….आणि देशात खप होतो ६४ कोटी लिटरचा… ४९ कोटी लिटर दुध कुठनं तयार होतं, ते तर आमच्या गायींना पण नाही माहित…! एवढं होऊन पण देवा, ती ईडी का बीडी दुसऱ्यांवर डुख धरती.. तशी यांच्याकडं लक्ष देत नायी.. शहरातल्या माणसास्नी ईख घालून मारायचं चाललंय…आन पाप मात्र आमच्या माथ्यावर… देवा, तुम्हाला म्हणून सांगते, मागच्या काही सालामधी एक लिटर गायचं दुध ईकलं की, एक लिटर डिझंल मिळायचं..म्हशीचं ईकलं की, एक लिटर पेट्रोल मिळायचं… आता चार लिटर ईकून बी एक लिटर पेट्रोल मिळत नाही… मागं दुधाच्या धंद्यावर घरप्रपंच चालायचा…सालाकाठी दागदागिनं घेयाचो..पोराबाळांची लग्नबी व्हायाची..आता देवा, गुराढोरातच अन बार्लीवारीच आता सगळा पैसा जायाला लागला.. देवा, आम्हास्नी मिळतोय १८ रुपै, पर दुधाच्या संघाचा मालक ४० रुपड्यांच्या खाली काही दुध सोड, ताक सुदीक ईकत नाही…मरण होतंय आमचं देवा… मरण आमचं होतंय…
किसनदेवा – ते कसं…
पहिली गवळण – ऐका…
बा किसनदेवा…!
कलीयुगाची ही कथाच न्यारी.. बळीराजाला सदा पाताळी गाढी.. शेतीत उरला नाही राम.. दुधाच्या धंद्यात नाही दाम…
किसनदेवा, ह्यो दुधाचा धंदा.. बळीपुत्रासाठी जणू विषाचा फंदा..
१५ लिटर दुधाची गाय आणली ६० हजारांला.. आन वर्षात ६५ हजारांचं दुध, अन् ९० हजार लागले खर्चाला…!! शेतकऱ्याच्या हातात येते उलटीच पट्टी… शेतमालासंगं आता दुधाची बी गट्टी..!! कोणतरी मग उठतो शेट्टी..देतो काही घोषणा.. बा, किसनदेवा…तरीबी दुधदर पदरात काही पडेना..! याचंच सगळे धंदे…आन यांचंच असतं सरकार.. खोट्या मलमपट्ट्यांचा देवा, आमच्या उत्पन्नावर वार..!!
बा किसनदेवा,. तुला आता अवतार घ्यावा लागंल.. मुचुकंदासारखी झोपलीय प्रजा, तिला उठवावं लागंल..!!माजलाय पुन्हा कालिया, त्याचा प्रतिशोध घ्यावा लागंल.. कंसचाणूर मर्दनाची तुला आहे शपथ… इथल्या बाजारबुडव्यांचं संपव सगळं रवंथ..!! खाऊन झालेत गलेलठ्ठ, शेतकऱ्यांच्या जिवावर… कालयौवनासारखं जाळून टाकं त्या लुटणाऱ्यांचं घर…!!
बा किसनदेवा, तुझा होता जो हेतू… त्याचा झाला ग्रंथ… ग्रंथातल्या ओव्या आणि ओव्या झाल्या संथ..!
कधीतरी, नाठाळांच्या माथी मारावी लागेल काठी.. बळीराजाला लुटणाऱ्यांची फेडावी लागेल लंगोटी.. कळीकाळालाही जुमानलं नाही त्वा,. आता त्याचीच गरज आहे.. दुधाच्या भातातलं शीत, माजलंय… त्याला जिरवायची गरज आहे..!!!










