दौंड तालुक्यातल्या कानगावमध्ये धडक कारवाई
दौंड : महान्यूज लाईव्ह पुणे ग्रामीण पोलिसांनी आज अवैध वाळू उपसावर कारवाई करताना आजवरचा सर्वात मोठी म्हणजे 1 कोटींचा ऐवज जप्त करीत १२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कानगाव (ता. दौंड) येथील भिमापात्रात ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक खास अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळत आहे. आज सकाळी कानगाव येथे बारामती क्राईम ब्रॅंचच्या पथकाने अचानक छापा टाकून वाळु उपशात सहभागी असलेल्या वाहनांसह ९३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत धडक कारवाई केली. कानगावच्या भीमा नदीपात्रात वाळू उत्खननाचा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना जेसीबी व बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा होत होता. या ठिकाणी चार फायबर बोटी, चार लहान बोटी, दोन ट्रक, तीन ट्रॅक्टर आणि १० ब्रास वाळू असा ९३ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलिस अधिक्षक संदिप पाटील, बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार पदमराज गंपले, पोलीस शिपाई सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, आरसीपी पथकातील ६ पुरुष ५ महिला पोलीस यांच्यासह ही कारवाई केली. या कारवाईत यवतचे पोलिस निरिक्षक भाऊसाहेब पाटील, दौंडचे सहायक निरिक्षक अजय अधिकारी, पाटसचे फौजदार सचिन घाडगे, पोलीस शिपाई विजय भापकर, सुधीर काळे, संपत खबाले, संतोष मदने यांनी मदत केली. तहसीलदार सचिन पाटील यांच्या सूचनेनुसार महसूल पथकाचे मंडल अधिकारी संदीप जाधव, तलाठी बालाजी जाधव आदींनी या कारवाईत भाग घेतला.










