महान्यूज : आजची गझल
तुझ्या एकाच स्पर्शाचे शहारे जन्मभर पुरले
तुझ्या डोळ्यातले गहिरे इशारे जन्मभर पुरले
कशाला आणखी काही तुला मागून घेवू मी
जुन्या झोळीत होते तेच तारे जन्मभर पुरले
नव्या कैदेमधे पुन्हा कशाला सांग जावे मी
मिळाले जन्मतः जे कोंडमारे जन्मभर पुरले
तशीही काळजी नाहीच केली मी तिजोरीची
तसेही भोवतीचे वाटमारे जन्मभर पुरले
पुढे आयुष्यभर आला जरी वैशाख भाळी पण
तुझे ते श्रावणी हसरे पिसारे जन्मभर पुरले
खणायाची कधी आलीच नाही वेळ माझ्यावर
दिले जे वेदनेने ते ढिगारे जन्मभर पुरले
कशाला गारदी ठेवू पगारावर पहा-याला
सग्यांचे सोय-यांचे हे पहारे जन्मभर पुरले
गझलकार : सुधाकर इनामदार
परिचय–
नाव–सुधाकर इनामदार
मु .पो.गोमेवाडी
ता.आटपाडी ,जि.सांगली
मो.९४२११२२०१७
प्रकाशित साहित्य
१–जागर(कवितासंग्रह)
२–इजांची मखमल(गझलसंग्रह)
सहसंपादक
नाथनगरी(साप्ताहिक)
नाथनगरी(दीपावली अंक)
पुरस्कार
१-नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा
२-परिमल साहित्य पुरस्कार
३-नरेंद्र विद्यापीठ उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार










