भीतीपोटी उजनीचा काठ हादरला
सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालूक्यातील उजनी जलाशयाच्या काठावर भावडी, चांडगावच्या शिवेवर आज उसाच्या शेतात बिबट्या दिसला आणि पाहणा-यांच्या काळजाचा ठोका चुकला. बिबट्या कॅमेऱ्यात जेरबंद झाला आणि कालपर्यंत त्रास असल्याचे सांगणारा वन विभाग गप्प झाला.
या भागातील नागरीकांना गेल्या आठवड्यात बुधवारी ( दि. 22 ) बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 31) पुण्याच्या कात्रज रेस्क्यु टीमचे प्रतिनिधी उमेश परदेशी यांनी या भागात येथील नागरीकांना भेटून नागरिकांच्या माहितीनुसार मार्गावरील ठशांची पाहणी केली होती. यावेळी या भागात दिसणारे हे ठसे बिबट्याच्या पावलाचे असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसत असल्याची माहिती दिली. त्यामुळे उजनीच्या काठच्या नागरिकांमध्ये बिबट्याच्या भितीचे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाचे कर्मचारी मात्र हा त्रास असेल असे सांगत होते. आज थेट बिबट्याच दिसला.
भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रूक, चितळकरवाडी भागातील नागरीकांना बिबट्याच्या दर्शनाने गावांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. काही नागरीकांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याचे म्हटले होते. वनखात्याला कळवूनही वनखात्याच्या अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देवुन तो बिबट्या नसल्याचे सांगत वेळ मारुन नेली होती. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असणा-या भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रूक, या भागात उसाच्या क्षेत्रात बिबट्याने तळ बसवला असल्याने शेतकरी घाबरत आहेत.
या बिबट्याचा व्हिडीओ येथे व महान्यूजच्या फेसबुक पेज वर पाहू शकता. https://www.facebook.com/111857893690352/posts/185778069631667/
भावडी येथील शेतकरी सोमनाथ मदने यांच्या शेळीचा वनविभागाशेजारी बळशिदबुवा मंदीराजवळ असणा-या शेतात ज्या भागात बिबट्याने फडशा पाडल्याचे सांगण्यात आले होते. त्या ठिकाणी पुण्याच्या कात्रज प्राणी संग्रहालयाचे रेस्क्यु पथकाचे उमेश परदेशी, कौठळी च्या वनरक्षक श्रीमती पी. बी.काटे यांनी पाहणी केली. त्यावेळी परदेशी यांनी तेथे असणा-या प्राण्यांच्या ठशांची पाहणी केली व त्यांनी बिबट्याचे ठसे असावेत असा अंदाज वर्तविला. या भागात लवकरच पिंजरा लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मात्र गेल्या आठवड्यात वनखात्याकडून मिळत असलेल्या बिबट्या नसल्याच्या माहितीमुळे वरकुटे बुद्रुक चे उत्तम फाळके यांनी वनखात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. बिबट्याच्या भीतीच्या छायेखाली अडकलेल्या ग्रामस्थांनी वनखात्याच्या अधिका-यांना सांगूनही अधिकारी कसलीच दखल घेत नसल्याचा प्रकार समोर येत असून वनखात्याच्या ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत आज इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आज पुण्याच्या रेस्क्यु पथकाचे उमेश परदेशी यांनी दुपारी भावडी, चांडगाव,वरकुटे बुद्रुक, करेवस्ती या भागात भेट दिली. शेतक-यांशी संवाद साधला.बिबट्या असल्याची त्यांना खात्री वाटत आहे. या भागात ऊस क्षेत्र जास्त आहे, पाणी आहे, तसेच त्याला त्याचे भक्ष्य मिळू शकते त्यामुळे तो या भागात राहीला असावा असा अंदाज परदेशी यांनी व्यक्त केल्याचे काळे यांनी सांगितले. या भागातील नागरीकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नये,काठ्या घेऊन आवाज करत कामासाठी जावे, पाळीव जनावरांच्या गोठ्याला कंपाउंड घालावे, लहान मुलांना घराबाहेर एकट्याला पाठवू नये, मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणी लावून शेती काम करावे, सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन राहुल काळे यांनी केले.











