बारामती : येथील बारामती ट्रेकींग क्लबने रायरेश्वर ते किल्ले केंजळगड अशी मोहिम आयोजित करून रायरेश्वरावर प्रजासत्ताक दिन साजरा केला. या मोहिमेत क्लबचे 26 सदस्य सहभागी झाले होते.
क्लबच्या सदस्यांनी यावेळचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी किल्ल्यांची निवड केली होती. त्यानुसार दोन दिवसांची ट्रेकींगची मोहिम त्यांनी आयोजित केली होती. अॅड. सचिन वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी रायरेश्वर मंदिरात किल्ल्यांच्या पर्यावरण व पावित्र्य जपण्याची शपथ घेत संकल्प केला व तेथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत ध्वजवंदनासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
आदिवासी पाड्यावर जाऊन विद्यार्थ्यांना भेटून दूरवरून येऊन शिक्षणाची उत्सुकता जपत असल्याबद्दल कौतुक केले. यावेळी रायरेश्वर मंदिर परिसरात ट्रेकिंग क्लबच्या सदस्यांनी प्रसिध्द गिर्यारोहक अरूण सावंत यांना श्रध्दांजली वाहिली. स्वराज्याच्या महाराणी ताराराणी यांची संगम माहुली येथील समाधी दुरावस्थेत आहे, त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेण्याचा ठरावही यावेळी ट्रेकींगच्या सदस्यांनी केला. त्याचबरोबर
कोकणकडे वरून उतरताना सावंत यांचा मृत्यू झाला त्या कड्याला अरुण कडा असे नाव देण्यात यावे असा ठराव राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आला. या ट्रेक मध्ये दोन्ही किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती इतिहास अभ्यासक योगेश वाघ यांनी दिली.










