राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील एमपीएससीच्या विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या स्वप्नील लोणकर यांच्या4 जुलै रोजी आत्महत्येच्या या घटनेने संपुर्ण राज्य हादरविले होते. आता दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
एमपीएससी ची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थीने आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. मल्हारी नामदेव बारवकर (वय 25, देऊळगाव गाडा ता.दौंड जि.पुणे.) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मल्हारी हा एमपीएससी ची पुर्व परीक्षेची तयारी करत होता, त्याने दोन तीन परिक्षेचे पेपर ही दिले होते. मात्र राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शुक्रवारी (दि.17) सायंकाळी चार वाजण्याच्या आसपास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, पाटस पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, याबाबत मल्हारी याचे चुलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी पाटस पोलीस स्टेशनला खबर दिली.
माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भानुदास बंडगर, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, पोलीस शिपाई समीर भालेराव, गणेश मुटेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.











