
बारामती : महान्यूज लाईव्ह
काल दिवसभर आणि रात्री जे + 140 क्रमांकाच्या कॉल वरून आलेले कुठलेही फोन उचलू नका तुमचे बँक खाते रिकामे होईल अशा प्रकारची भीती घालणारी एक व्हिडीओ क्लिप फिरत होती आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं, तो खेळ एका मनोरंजन करणाऱ्या टीव्ही वाहिनीने तिच्या एका मालिकेच्या प्रसारासाठी केला होता, या टीव्ही वाहिनीने दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र महाराष्ट्र पोलिसांनी व सायबर पोलिसांनी देखील त्याची गंभीर दखल घेतली आहे
मुंबई पोलिसांच्या नावाखाली व्हायरल झालेल्या या व्हिडीओने मुंबईकरांसह राज्यात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल पोलीस गाडीचा मेगा माईक वरून नागरिकांना सायबर गुन्हेगाराबाबत जनजागृती करीत “१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते असे सांगत असल्याचा एक व्हिडीओ काल संध्याकाळपासून सर्वत्र फिरत होता, एवढेच नाही काही बहाद्दरांनी तर मी तो कॉल घेतला नाही, त्यामुळे माझ्या बँकेतील जाणारे पैसेही रोखले गेले अशा प्रकारचा पण एक व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर वायरल केली. त्यामुळे नेमका काय आहे याविषयी लोकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचे वातावरण होते.
गंमत म्हणजे काही वेळानंतर लागलीच महाराष्ट्र सायबर सेलने देखील ट्विट करून अशा प्रकारचे कॉल घेऊ नका असे ट्विट केले. त्यामुळे ही भीती आणखीनच वाढली. मात्र या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र सायबर पोलिसांनी देखील हा प्रकार नेमका काय आहे आता पाहिला नव्हता हे समोर आले आहे. खरा प्रकार हा एका मनोरंजन वाहिनीसाठी केलेल्या प्रमोशनचा एक भाग होता हे समोर आले आहे.
सोनी लाईव्ह नावाच्या मनोरंजन वाहिनीने आपल्या नवीन येणाऱ्या एका अनदेखी नावाच्या मालिकेच्या प्रमोशन साठी +140 या नंबर वरून अनेक जणांना टेलिमार्केटिंग कॉल केला आणि नंतर त्याच नंबरपासून सावधान राहा असे सांगणारा व्हिडिओ तयार करून तो प्रसारीत केला हे नकारात्मक ते पासून सकारात्मकतेकडे जाणाऱ्या नवीन प्रकारचे प्रमोशन असले तरी कोरोना च्या काळामध्ये अगोदरच लोक घाबरले असताना अशा प्रकारचे भीतीदायक मेसेज पसरवण्याचा मनोरंजन कंपनीला अधिकार होता का हे तपासण्याची गरज आहे.
पोलिसांनी यामध्ये अत्यंत कडक भूमिका घ्यावी अशी मागणी मुंबईतील अनेक नामवंतांनी केली, यानंतर मात्र सोनी लाईव्ह मनोरंजन दूरदर्शन वाहिनीने ट्विट करून लोकांना त्रास झाला असेल तर आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त करतो अशा प्रकारचे ट्विट केले, परंतु अशा प्रकारे दिलगिरी व्यक्त करून राज्यभर गोंधळ तयार करण्याचा अधिकार या वाहिनीला होता का? हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. आता पोलीस यावर ती नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे ठरेल.











