मुंबई : महान्यूज लाईव्ह
देशातील वैद्यकीय क्षेत्रासाठी थोडी काळजी करावी अशी बातमी येते आहे. देशामध्ये सिरिंज आणि वैद्यकीय कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या सुयांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिरिंज आणि सुयांची निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी हिंदुस्थान सिरिंज अॅन्ड मेडिकल डिवाईसेस या कंपनीने आपला हरियाणातील फरिदाबाद येथील उत्पादन आजपासून बंद केले आहे.
हरियाणा प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशामुळे हा कारखाना बंद करण्यात आला आहे.
फरिदाबाद येथे कंपनीची चार उत्पादन केंद्रे होती. सिरिंज आणि सुयांच्या देशातील पुरवठ्यापैकी ६० टक्क्याहून जास्त वाटा या कंपनीचा आहे. हे उत्पादन खुप काळ बंद राहिल्यास देशभरात टंचाई निर्माण होऊ शकते.
कंपनीचे कार्यकारी संचाल राजीवनाथ यांनी सांगितले की,आज ( शनिवार ) पासून आम्ही आमचे उत्पादन बंद केले आहे. आमच्याकडे दोन दिवसापेक्षा जास्त स्टॉक उपलब्ध नाही. त्यामुळे सोमवारपासून आम्ही सिरिंज आणी सुयांचा पुरवठा करू शकणार नाही. ही कंपनी दररोज १.२ कोटी सिरींजचा पुरवठा करते तो सोमवारपासून उपबद्ध होणार नाही. ज्या दुसऱ्या प्लॅंटमधून ४० लाख सिरींजचा दररोजचा पुरवठा होतो, त्याचाही यामध्ये समावेश आहे. तो प्लॅंटही सोमवारपासून बंद होतो आहे.
सिरिंजचा सध्या भारतात आणि जगातही तुटवडा आहे. त्यात हे उत्पादन बंद झाल्यास टंचाई वाढण्याची शक्यता आहे.
कंपनी डिझेल जनरेटरचा वापर करत असल्याच्या कारणामुळे उत्पादन बंद करावे असा आदेश हरियाणा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडू देण्यात आला आहे.











