इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. इंदापूर शहरात वास्तव्यास असलेल्या आणि सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७२ वर्षीय वृद्धाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे इंदापूर शहरातील कोरोनामुळे बळी पडलेल्या रुग्णांची संख्या दोन; तर एकूण बळींची संख्या तीनवर पोहोचली आहे.
इंदापूर शहरातील महतीनगर येथे वास्तव्यास असलेल्या ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापूर्वीही शहरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एका वृद्ध रुग्ण मृत पावल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या रुग्णाच्या मृत्यूनंतर तालुक्यातील कोरोनामुळे झालेल्या बळींची संख्या तीनवर गेली आहे. त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून याबाबत अधिकाधिक दक्षता घेतली जात असतानाच एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.











