बारामती : महान्यूज लाईव्ह
वनक्षेत्राच्या हद्दीत भरदिवसा झालेल्या चिंकारा हरणाच्या शिकारप्रकरणी राजेंद्र शंकर आडके याला वनखात्याने अटक केली. चार दिवसांपूर्वी पार्टीसाठी म्हणून ही शिकार करण्यात आल्यानंतर वनखात्याने व्हिडीओ क्लिपच्या सहाय्याने राजेंद्र आडके याला फलटण तालुक्यातील बरड येथून ताब्यात घेतल्याची माहिती वन अधिकारी त्र्यंबक जराड यांनी दिली.
चार दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील जैनकवाडी परिसरात वनक्षेत्रात भरदिवसा चिंकारा जातीच्या हरणाची शिकार झाल्याचा प्रकार समोर आला होता. पवारवस्ती येथे या चिंकाराची शिकार झाली होती. या प्रकरणानंतर वन्यप्रेमींनी संताप व्यक्त करत आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली होती. वनखात्याने या प्रकरणानंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. त्यामध्ये शिकारीशी निगडीत काही व्हिडीओ क्लिप्स वनखात्याला मिळाल्या. त्यानुसार वनखात्याला आरोपीचा शोध घेण्यात यश मिळाल्याचे त्र्यंबक जराड यांनी सांगितले.
राजेंद्र आडके (रा. कटफळ, ता. बारामती) याने ही शिकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणानंतर आडके याला फलटण तालुक्यातील बरड येथून वनखात्याने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी करुन पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का याचाही उलगडा होणार आहे.










