दौंड वंचित बहुजन आघाडीची मागणी
दौंड : महान्यूज लाईव्ह
नागपुर येथील अरविंद बनसोडे यांची हत्या व प्रेम प्रकरणातून पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या युवकाची जातीय द्वेषातून झालेली हत्या मानवतेला काळीमा असून या दोन्ही हत्याकांडाची शासनाने तातडीने सीबीआय चौकशी करावी अशी मागणी दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
कोरोना सारख्या महामारीच्या संकटातही दलित समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. केवळ जातीय द्वेषातून या घटना घडत आहेत. नागपुर जिल्हातील नरखेड येथील उच्चशिक्षित युवक अरविंद बनसोडे याची हत्या करण्यात आली. मात्र पोलीसांनी हे आत्महत्या असल्याचे भासवून सदर घटना दडपण्याचा प्रयत्न करीत आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेने केला. यामुळे राज्यातील दलित व बौध्द समाज अस्वस्थ झाला आहे. पुरोगामी राज्यात जातीयता नसानसात असल्याचे या घटनेवरून सिध्द होत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी या दोन्ही हत्याकांडाची तातडीने सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, शहराध्यक्ष अनिकेत मिसाळ, अक्षय शिखरे, मयुर जाधव, नागेश आरडे आदींनी केली.










