इंदापूर : इंदापूर येथे महिलांसाठी हळदी कुंकू, तिळगुळ व वाण वाटप समारंभ उत्साहात व महिलांच्या प्रचंड गर्दीत शनिवारी (दि.25) संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी पुरस्कार प्राप्त सौं.गौरी तावरे-थोरात यांचे ‘ मी जिजाऊ बोलते ‘ या विषयावर हृदयस्पर्शी असे व्याख्यान झाले. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. त्यांचा आदर्श घेऊन महिलांनी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करावेत, असे आवाहन यावेळी व्याख्यानात बोलताना गौरी तावरे-थोरात केले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी इंदापूर तालुका जिजाऊ महिला बचत गट असोसिएशन, इंदापूर पंचायत समिती व इंदापूर नगरपालिका यांच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. आगामी काळात महिलांसाठी नवीन उपक्रम राबविण्यात येतील,असेही त्यांनी भाषणात सांगितले.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मार्गदर्शन केले. महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना लागेल ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.याप्रसंगी इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके व इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका जिजाऊ महिला बचत गट असोसिएशन, इंदापूर पंचायत समिती व इंदापूर नगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले होते.
शिवाजी महाराजांनी माणुसकीचा धर्म पाळला.
राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात न पाळला फक्त माणुसकीचा धर्म पाळला व स्वराज्य स्थापन केले.हे केवळ राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे शक्य झाले,असे गौरवोद्गार या कार्यक्रमात बोलताना गौरी तावरे-थोरात यांनी काढले.










