पुणे : महान्यूज लाईव्ह
ओबीसी आरक्षण कृती समितीला कोरोनाचे कारण पुढे करुन बारामतीतील नियोजित 29 जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या एलगार महामोर्चा साठी पोलिसांनी परवानगी नाकारली असली, तरी आज आरक्षण समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा काढणारच असे स्पष्ट करण्यात आले. राज्यात इतर समाजाचे मोर्चे निघत असताना, फक्त ओबीसींचा च मोर्चाला विरोध का? असा प्रश्न करत आरक्षण कृती समितीने आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत असे स्पष्ट केले आहे
आज समितीच्या वतीने पुण्यात हे स्पष्ट करण्यात आले की, या मोर्चाची संपूर्ण तयारी झाली असून त्याकरता गावोगावी घोंगडे बैठका घेण्यात आले आहेत त्यामुळे या मोर्चासाठी राज्यभरातून जवळपास पन्नास हजार लोक येणार आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा होणार असून या मोर्चाच्या निमित्ताने कलम 144 चे हनन होणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. परंतु अत्यंत शांततेत व सर्व प्रकारचे नियम पाळून हा मोर्चा होईल. या मोर्चाला कोणीही आडवे येऊ नये असा इशारा देखील समितीच्या वतीने देण्यात आला.
ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय हक्क संपुष्टात आले आहेत. हा ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. आणि यास राज्य आणि केंद्र ही दोन्ही सरकार जबाबदार आहेत. दोन्ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजवार अन्याय होत आहे. त्यामुळे ओबीसी समाजात मोठी अस्वस्था पसरली आहे. ओबीसी हा शांतताप्रिय समाज आहे. बारामती मधील हा मोर्चा शांततेत पार पाडेल असा विश्वास यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ठरल्याप्रमाणे या मोर्चासाठी नाना पटोले, विजय वडेट्टीवर, चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, राम शिंदे, योगेश टिळेकर, हे ओबीसी नेते कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. आम्ही छगन भुजबळ यांनाही निमंत्रित केले आहे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.











