संपूर्ण कन्हेरी गावात आर्सेनिकम अल्बम 30 चे मोफत वितरण
बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोना प्रतिबंधासाठी अजून लस बाजारात नसली तरी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हाच सध्याचा महत्वाचा उपाय आहे, सरकारी यंत्रणा याबाबत जनजागृती करीत असली तरी त्याला मर्यादा आहेत. हे जाणून घेऊन शरयू फाऊंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार यांनी पुढाकार घेऊन
कन्हेरी हे सामूहिक प्रतिकारक शक्ती वाढविणारे गाव ठरावे यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
कन्हेरी गावातील सर्व कुटुंबांतील सर्व सदस्यांना होमिओपॅथीतील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपकारक ठरणारे अर्सेनिकम अल्बम – ३० हे औषध वितरीत करण्यात आले. सौ. पवार यांच्या उपस्थितीत हे औषध वितरीत करण्यात आले. भवानीनगर येथील प्रसिध्द होमिओपॅथिक तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राकेश मेहता यांनी हे औषध उपलब्ध करून दिले. त्यांच्या सल्ल्यानुसार या औषधाचे कन्हेरीत वितरण करण्यात आले. या वितरणावेळी डॉ. राकेश मेहता, बारामतीच्या सौंदर्यतज्ज्ञ डॉ. शीतल मेहता, समुदाय वैद्यकीय अधिकारी शुभांगी देशमुख, आरोग्य विभागाचे पुष्पराज निंबाळकर यांनी ग्रामस्थांना या औषधाचे फायदे व औषधाच्या सेवनाविषयी माहिती दिली.
कन्हेरी गावात सध्या शर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांची कामे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संपर्ण गावाचीच रोगप्रतिकारक शक्ती सामूहिकरित्या वाढावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. एकाचवेळी संपूर्ण गावात असा उपक्रम राबविणारे कन्हेरी हे पहिलेच गाव आहे. या कार्यक्रमास गावचे सरपंच सतीश काटे, देविदास देवकाते, अॅड रोहित काटे, नारायण शिंदे, विष्णू धोत्रे, शंकर काळे, विनोद काळे, रामभाऊ खोत आदी उपस्थित होते.











