बारामतीत कोरोनायोध्द्यांची सामाजिक बांधिलकी
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती ही राज्याचीच नव्हे तर देशाची राजकीय दिशा देणारी नगरी आहे असे म्हटले जाते, अगदी विरोधक देखील अशा १०० बारामती देशात हव्यात असे म्हणतात..पण हे का? फक्त विकासकामे झाली म्हणून?…नाही..! ती इथली संस्कृती, संवेदनशीलता आणि माणूसकीची माणसांप्रती असलेली बांधिलकी..म्हणूनच लॉकडाऊनच्या काळात या बारामतीने ज्या पध्दतीने दीड हजार परप्रांतिय बांधकाम मजूर सांभाळलेत, त्याचा प्रवास अनुभवला की, ही बारामती आणि पवार कुटुंबिय राज्यातील समर्थक अथवा विरोधकांसाठी अप्रुप किंवा हेवा असलेले का वाटतात या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळते…!
कोरोनाचा जानेवारीत जरी रुग्ण आढळला तरी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाले आणि संपूर्ण राज्यातच श्रमिकांची मोठी कोंडी झाली. बारामतीतही दीड हजारहून अधिक बांधकाम मजूरांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे निर्माण झाली. त्याचवेळी क्रेडाई बारामती ही संघटना पुढे आली. या संघटनेने सेंट्रल किचनमार्फत बारामतीच्या पाच किलोमीटरच्या परिघात राहत असलेल्या दीड हजार परप्रांतिय मजूरांच्या जेवणाची गेली दोन महिने बिनबोभाट व्यवस्था केली आहे…अगदी वेळेनुसार या मजूरांना जेवण मिळते, तेही चविष्ट..!
क्रेडाई बारामतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यात योगदान दिलेच आहे, अध्यक्ष सुरेंद्र भोईटे व त्यांचे सहकारी गेली दोन महिने दोन वेळचे जेवण बारामतीत अडकलेल्या परप्रांतिय मजूरांसाठी स्वयंस्फूर्तीने पोचवत आहेत. लॉकडाऊननंतर बारामती शहर व परिसरातील बांधकाम बंद केल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील सर्व मजूरांचा रोजगार बंद झाला आहे. त्यांच्या उत्पन्नाचे साधनच बंद झाले. याखेरीज त्यांना स्वतःच्या भोजनाची देखील भ्रांत जाणवू लागली. त्यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी क्रेडाईने पुढाकार घेतला. बरामतीतील परप्रांतिय मजूरांची मागणी घेतली. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी राज्य सरकार काहीतरी करणार आहे याचा विश्वास दिला. क्रेडाई बारामतीने घेतलेला पुढाकार हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आधारानेच होता. परप्रांतिय मजूरांचे हाल होऊ नयेत यासाठी क्रेडाईने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ या मजूरांना मिळावा यासाठी साकडे घातले. अजित पवार यांनी गांभिर्याने व तातडीने लक्ष घालून त्याची मंजूरी देण्याची सूचना संबंधितांना दिली आणि या योजनेचे सेंट्रल किचन जे की, चाकण (पुणे) येथे आहे, तेथून या भोजनाची गाडी थेट बारामतीत येईल अशी व्यवस्था केली.
या योजनेचा मुख्य उद्देश परप्रांतिय मजूरांना आपल्या गावाने सांभाळावे, त्यांचे हाल होऊ नयेत अशी होती. अजित पवारांनी दोन दिवसांत बारामतीत ही योजना सुरू केली आणि मजूरांना दोन वेळचे भोजन वेळेत मिळू लागले. सुरेंद्र भोईटे यांनी यासाठी अपार कष्ट घेतले. माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या शालेय पोषण आहारात मोलाची कामगिरी करणारे वैभव जगताप व प्रकाश मत्रे यांनी यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आणि सुरू झाला बारामतीच्या पूर्व व पश्चिम भागाचा मार्गनिहाय प्रवास!
चाकण येथून निघालेले वाहन साडेबारा वाजेपर्यंत बारामतीत पोचते, तेथून बारामतीतील स्थानिक वाहनांमध्ये त्यांच्या मार्गानुसार लाभार्थी असलेल्या मजूरनिहाय जेवणाचे डबे भरले जातात. पूर्व भागाचे वाहन बारामती औद्योगिक वसाहतीपर्यंत व पश्चिम भागाचे वाहन शारदानगरपर्यंत जाते. या दोन्ही भागात मिळून १३७८ मजूर राहतात. ही योजना सुरू केली, तेव्हा १ हजार ७९ मजूरांना पहिल्या दिवशी भोजन दिले होते. आता ही संख्या १३७८ मजूरांपर्यंत पोचली आहे. मजूरही समाधानी आहेत. या भोजनात चपाती, भाजी, भात, लोणचे, गूळ, कांदा, काकडी, स्नॅकचे पाकीट असते.
सुरेंद्र भोईटे म्हणतात, बांधकाम क्षेत्रातील एकही बांधकाम मजूर उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली गेली. बारामतीत झालेले हे काम मजूरांना समाधान देणारे ठरले व दिर्घकाळ चालल्याने मजूरांना बारामतीबद्दलचा वाटणारा विश्वास आणखी दृढ झाला आहे.










