दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यामागील कोरोनाचे शुक्लकाष्ट आता संपता संपत नाही अशा स्वरुपाचे बनू लागले आहे. राज्य राखीव पोलिस दलातील जवानांना झालेली लागण ही मुंबईतून झाली असे म्हणत असतानाच शहरात आज एकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक ७ मधील एक व दौंड येथील भारतीय रिझर्व्ह बटालीयन कोल्हापूर गट क्रमांक १६ मधील तीन असे एकूण पाच जण नव्याने कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज एका दिवसात दौंड तालुक्यात पाच कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली.
दौंडचे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. तालुक्यातील दहिटने येथील ७० वर्षाचा वृध्द रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. हायरिस्क रुग्णाने कोरोनामुक्त होणे ही दौंड तालुक्यासाठी तशी आनंदाची बाब होती, मात्र त्याचा आनंद साजरा करण्याचीही वेळ दौंड तालुक्यावर कोरोनाने येऊ दिली नाही. दहिटणे येथील रुग्णाची कोरोनामुक्तीची बातमी कानावर येत नाही, तोच दौंड शहर व तालुक्याला हादरा सोडणारी बातमी मिळाली. शहरात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा चहाचा व्यवसाय आहे. नागरिकांनी कोरोना विरुद्ध अधिक सतर्क राहण्याचे आव्हान आरोग्य विभागाने केले आहे.











