मुंबई: महान्यूज लाईव्ह
कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे आणि दुसरीकडे भाजप व महाविकास आघाडीत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तणातणी सुरू आहे. त्यातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आमदार होण्यापासून रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी आखलेला चक्रव्यूह तसेच दररोज विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची निती यामुळे ही तणातणी सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप नेते ट्रोलर्समुळे प्रचंड हैराण आहेत. फक्त हसणाऱ्या ट्रोलर्समुळे काही भाजप नेत्यांना त्यांचे फेसबुक लाईव्ह बंद करावे लागले, तर काहींना त्यांचे व्हिडीओ काढून टाकावे लागले. एकेकाळी ट्रोलींगमध्ये अग्रस्थानी असलेल्या भाजपच्या आजच्या अवस्थेमुळे भाजप द्विधा मानसिकतेत आहे.
सध्या कोरोनापेक्षा तरुणाईत भाजप व महाविकास आघाडीच्या समर्थकांदरम्यान होत असलेल्या ट्रोलिंगचीच चर्चा आहे.भाजप नेते यावरून प्रचंड हैराण आहेत, मात्र याला सुरवात झाली ती, पंतप्रधान निधीला मदत करा असे आवाहन करणाऱ्या भाजप नेत्यांच्या सर्रास पोस्ट दिसू लागल्याने! भाजप नेते हे आवाहन राजकीय द्वेष मनात बाळगून करीत आहेत आणि ते जाणीवपूर्वक करीत आहेत या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये संतापाची भावना आहे. एकीकडे महाराष्ट्राने सर्वाधिक जीएसटी देऊनही, कर देऊनही आणि देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असूनही केंद्र सरकार महाराष्ट्राला मात्र कमी निधी देत आहे आणि महाराष्ट्रातीलच भाजप नेते मुख्यमंत्री निधीला मदत करू नका असे अप्रत्यक्ष आवाहन करीत प्रधानमंत्री केअर फंडात पैसे जमा करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यासाठी पुढाकार घेत आहेत. हे कारण देत महाविकास आघाडीचे समर्थक चिडले आहेत. त्यातूनच सध्या भाजप नेत्यांना जाणीवपूर्वक ट्रोल केले जात आहे. यातून देवेंद्र फडणवीसांपासून ते सुधीर मुनगुंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, आशिष शेलार, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आदी दिग्गज भाजप नेते सुटले नाहीत. मागील आठवड्यापासून हा प्रकार सुरू असून कोरोनाच्या हातघाईच्या संकटात ही राजकीय धुमश्चक्री झाली आहे. सुधीर मुनगुंटीवार यांनी त्यांचा अगोदर अपलोड केलेला लाईव्ह व्हिडीओ एका तासानंतर फेसबुक पेजवरून हटवला. महाविकास आघाडीचे ट्रोलर भाजप नेत्यांना ट्रोलींग करताना हसण्याचे इमोजी टाकतात, तसेच महाराष्ट्रात मते मागून दिल्लीला पैसे पाठविता यावरूनही जोरदार टिका केली जात असल्याने भाजपचे नेते हैराण झाले आहेत. मुनगुंटीवार यांनी तर 141 जण पुणे, सातारा जिल्ह्यातील असून मी त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. अर्थात अजून मुनगंटीवार यांनी पोलिसांत तक्रार दिलेली नाही.
महाविकास आघाडीचे नेतेही लक्ष्य
या नेत्यांना ट्रोल करणाऱ्यांचे केंद्र पुणे व सातारा असल्याची भाजपमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपकडूनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्वादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य ठरवले गेले. त्यातही महाविकास आघाडीच्या वरीष्ठ महिला पदाधिकाऱ्याविरोधात अश्लील वाक्ये लिहील्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एकंदरीतच राज्यातील सध्याच्या संकटाच्या परिस्थितीतही राजकीय खणाखणी समाज माध्यमांवर सुरू आहे.










