बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत हनी ट्रॅपच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवून अॅट्रॉसिटी कायद्याची भीती दाखवत तब्बल 50 लाखांची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनु
सार, फिर्यादी हे शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी असून बारामतीतील एका प्रशिक्षण केंद्रात गेस्ट लेक्चरर म्हणून येत असताना त्यांचा काही व्यक्तींशी परिचय झाला. त्यानंतर एका महिलेकडून वारंवार फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून सुरुवातीला मार्गदर्शनाच्या नावाखाली संवाद सुरू करण्यात आला. मात्र, पुढे हा संवाद नियोजनपूर्वक ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढण्यासाठी असल्याचे समोर आले.
संशय आल्याने फिर्यादी यांनी संबंधित नंबर ब्लॉक केला; मात्र आरोपींनी दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत संवाद सुरू ठेवला. काही दिवसांनी व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत बदनामीचा डाव रचण्यात आला.
यानंतर आरोपींनी खोट्या बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत तब्बल ₹50 लाखांची मागणी केली.
ही रक्कम पुढे टप्प्याटप्प्याने ₹25 लाख आणि नंतर ₹10 लाखांपर्यंत कमी करण्यात आली. दरम्यान, 5 ते 13 एप्रिल दरम्यान आरोपींकडून किमान सहा वेळा फोन करून खंडणीची मागणी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी दबाव वाढवत फिर्यादींकडून ₹1 लाखांची रक्कम उकळण्यात यश मिळवले, जी बारामती MIDC परिसरातील पेट्रोल पंपाजवळ मध्यस्थामार्फत देण्यात आली.
पुढे फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटीस बोलावून वाहनात बसवून त्यांचा मोबाईल तपासण्यात आला आणि दोन तासांहून अधिक काळ मानसिक दबाव टाकत पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकारात आरोपींकडून हनी ट्रॅप, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ब्लॅकमेलिंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून संगनमताने गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी फिर्यादीकडील सर्व डिजिटल पुरावे जप्त करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे. यामध्ये FSL मार्फत आवाजाची पडताळणी, CCTV फुटेज तपास आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) विश्लेषणाचा समावेश आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अपरिचित व्यक्तींशी सोशल मीडिया किंवा व्हिडिओ कॉलद्वारे वैयक्तिक संपर्क टाळावा. कोणतीही खाजगी माहिती किंवा फोटो शेअर करू नयेत. अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागल्यास घाबरून न जाता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप अधीक्षक श्री गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक श्री रत्नदीप भंडारे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप जाधव, पोलीस हवालदार श्री रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई विशाल शिंदे व पोलीस शिपाई संतोष जगताप यांनी केला.










