राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील मलठण येथील पुनर्वसन येवले वस्तीत सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. आमदार राहुल कुल यांनी १४ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही संबंधित ठेकेदाराने दर्जाहीन काम केल्याचा आरोप असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या नोटीसनंतरही सहा महिने उलटून गेले तरी परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
मलठण येथील येवले वस्ती आणि मलठण-चिंचोली रोडवरील पुनर्वसन भागात एकाच ठेकेदाराने सिमेंट रस्त्यांची कामे केली. मात्र काही महिन्यांतच या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्ता उघडाच पडल्याचे चित्र आहे. दुचाकी-चारचाकी वाहनांची सोय तर दूरच; पायी चालणेही कठीण झाले आहे.
ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर १० डिसेंबर २०२५ रोजी सहाय्यक अभियंता एम. आर. सोनवणे यांनी ठेकेदार अनिल भीमराव जाधव यांना काम पूर्णपणे काढून टाकून अंदाजपत्रक व मानकांनुसार नव्याने करण्याचे स्पष्ट लेखी आदेश दिले होते.
या आदेशात M-30 ट्रिमिक्स काँक्रीटचे काम मानकांनुसार नसल्याचे नमूद करून तात्काळ पुनर्बांधणी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सहा महिने उलटूनही रस्त्याचे काम न दुरुस्त करता परिस्थिती जैसे थेच आहे. इतकेच नव्हे तर, कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेला उद्घाटनाचा माहिती फलकही हटवण्यात आल्याचा आरोप आहे. ठेकेदार “मी आमदारांचा माणूस आहे, कुठे तक्रार करायची ती करा” अशी धमकी देत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.
यामुळे “ठेकेदारांची ही मुजोरी नेमकी कोणाच्या पाठबळावर?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ दोघेही हतबल झाल्याचे चित्र असून, संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी व रस्त्यांचे काम तात्काळ दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, सहाय्यक अभियंता एम. आर. सोनवणे यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला दोन वेळा पत्रव्यवहार करून काम नव्याने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही काम न झाल्याने पुढील कारवाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात आमदार राहुल कुल यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.











