जालन्याच्या भ्रष्ट आयुक्ताचा मुखवटा फाटला! 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला गेलेला संतोष खांडेकर! ठेकेदारांनी फोडले फटाके – जनता विचारते, अशा अधिकाऱ्यांना दिलं कोणी पद?
जालना : महान्यूज लाईव्ह
शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ठेकेदारांनी दिवाळी फटाके फोडून एसीबीचं स्वागत केलं! कारण होतं, जालना महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकर, जो 10 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाच्या हाती रंगेहात पकडला गेला!
नगरपालिकेच्या डीपी रोड, सीमेंट काँक्रिटकरण आणि तिसऱ्या मजल्याच्या कामाच्या बिलांच्या मंजुरीसाठी एकूण 20 लाखांची लाच मागणारा हा आयुक्त, 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारत असताना एसीबीने सापळा रचून पकडला. पहाटेपर्यंत एसीबीच्या जालना आणि संभाजीनगर पथकांकडून त्याच्या घराची झडती सुरू होती.
खरे तर हा संतोष खांडेकर काही साधा माणूस नाही. सांगोला (जि. सोलापूर) येथील रहिवासी. एकेकाळी पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून यवतमाळ व अमरावतीत सेवा केली. त्यानंतर MPSC परीक्षा देऊन वर्ग 2 अधिकारी म्हणून शासकीय सेवेत दाखल. सन 2022 मध्ये जालना नगरपालिकेचा CEO झाला, आणि पुढे 9 मे 2023 रोजी महानगरपालिकेचा पहिला आयुक्त म्हणून रुजू झाला.
पण सत्ता, खुर्ची आणि पैसा यांचा माज इतका वाढला की, अखेर लोकांच्या हातात आले एसीबीचे हत्यार आणि मनगटात अडकल्या बेड्या! जालना महानगरपालिकेत या अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराच्या चर्चा जोरात होत्या. ठेकेदारांकडून बिल पास करण्यासाठी लाच मागण्याची ही पहिली वेळ नव्हती, असं शहरात बोललं जातंय. मात्र यावेळी एसीबीच्या सापळ्यात तो थेट रंगेहात सापडल्याने लाचखोर सनदी अधिकाऱ्यांचा बुरखा फाटला! असं चित्र निर्माण झालं आहे.
दरम्यान, काल सायंकाळी सात वाजताच एसीबीने ही कारवाई केल्यानंतर काही ठेकेदारांनी थेट एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला! म्हणजे जणू भ्रष्टाचारावरचा विजयच! जनतेचा प्रश्न मात्र सरळ आहे, असा हरामखोर अधिकारी इतक्या मोठ्या पदावर कसा पोहोचला? आणि प्रशासनात अजून किती खांडेकर लपलेले आहेत? भ्रष्टाचाराविरुद्ध एसीबीची ही कारवाई फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नसावी. कारण या लाचखोर यंत्रणेचा संपूर्ण भुगा फोडण्याची वेळ आता आली आहे!











